पुणे : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे जागोजाग चिखल झाला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर सर्व प्रकारची दुकाने उघडल्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नागरिक मध्यवस्तीत झालेल्या वाहतूककोंडीत अडकले. पालिका प्रशासनाचा ठेकेदारांवर नसलेला अंकुश आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला.
शहरातील महत्त्वाचा असलेला बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खोदाई करून ठेवण्यात आलेली आहे. समान पाणी पुरवठा योजनेच्या खोदाईचे काम काही रस्त्यांवर सुरू आहे. यासोबतच मध्यवस्तीतील मलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते मोठ्या प्रमाणावर उकरण्यात आले आहेत. हे उकरलेले रस्त्यांवरील खोदाईची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले होते. परंतु, ही कामे अद्यापही मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन ढेपाळले. शहरातील निर्बंध शिथिल करून सर्व प्रकारची दुकाने दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे मंगळवारी पुणेकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.
जागोजागी खोदलेले रस्ते आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेली वाहने यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेकांना खरेदी करता आली नाही. जागोजागी मातीचे ढिगारे आणि त्यामुळे रस्त्यावर आलेला चिखल यामुळे रस्ते निसरडे झाले होते. यामुळे वाहने घसरून किरकोळ स्वरूपाचे अपघात घडले.
---
१. टिळक रस्त्यावर पावसाळापूर्व कामे सुरू आहेत. या ठिकाणी जलवाहिन्या टाकण्याची कामे अद्यापही सुरूच आहेत. अर्धवट दुरुस्ती करण्यात आल्याने कोंडीत अधिकच भर पडली. या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे सिमेंट क्राॅंक्रीटचा रस्ताही खचला आहे.
२. लक्ष्मी रस्ता आणि परिसरामध्ये ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू आहे.
३. नारायण पेठेकडून शनिवार पेठेकडे जाणारा रस्ता बंद केला आहे.
-----
शहरात पावसाळापूर्व कामे सुरू असून समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. यासोबतच मलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. लॉकडाऊनमुळे ठेकेदारांना पुरेशी यंत्रणा उपलब्ध होऊ शकली नाही. कामे उशिरा सुरू झाल्याने पूर्ण होण्यास उशीर होतोय. ही कामे लवकर पूर्ण केली जातील.
- मुरलीधर मोहोळ, महापौर
--- --
रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ही कामे पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्त स्तरावर, अतिरिक्त स्तरावर याबाबत बैठका घेण्यात आल्या आहेत. विभागप्रमुखांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत ही कामे पूर्ण केली जातील.
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
------