नितीन ससाणे। लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : शहरात प्रामुख्याने विविध बँकांची कार्यालये, नगरपालिकेची व्यापारी संकुले, काही व्यावसायिक दुकाने यांच्यासमोरील वाहने पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या संख्येने जटिल होत चालली आहे. नागरिकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बँका, व्यापारी संकुले, मोठी दुकाने यांच्याकडे येणारे ग्राहक थेट रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीला होणारा अडथळा नित्याचाच ठरत आहे.प्रामुख्याने विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या नवीन कार्यालयासमोर रोजच दुचाकी वाहनांची मोठी गर्दी दिसून येते. पूर्वी बँकांची कार्यालये गावात होती परंतु वाहनाची संख्या कमी असल्याने पार्किंगची वाहतुकीची समस्या जाणवत नव्हती. परंतु आता घरटी दुचाकी वाहने झाल्याने पार्किंगच्या समस्येने डोके वर काढले आहे. आता नवीन बसस्थानक ते छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठ तयार झाली आहे. व्यवसयवृद्धीच्या दृष्टिकोनातून प्रमुख बँकांनी या रस्त्यावर आपली कार्यालय स्थलांतरित केलेली आहेत. या रस्त्यावरच नवीन बसस्थानक आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाजगी प्रवासी जीपगाड्या मोठ्या संख्येने उभी असतात. त्यातच जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात शेतमालवाहतुकीच्या वाहनांची रोजचीच वर्दळ असते. तर नवीन बसस्थानकात एसटी बसची रोजचीच वाहतूक सुरू असते. त्यामुळे या परिसरात रस्त्यावर वाहनांच्या संख्येत मोठी भर पडते. नवीन बसस्थानकासमोरच बँक आॅफ इंडियाचे कार्यालय आहे.बँकेच्या इमारतीत पार्किंगची सुविधा नसल्याने बँकेत येणारे ग्राहक बँकेसमोरील मोकळ्या जागेपासून थेट मुख्य रस्त्यापर्यंत दुचाकी वाहने उभी करतात. या रस्त्यावरून पश्चिमेकडून येणाऱ्या एसटी बस स्थानकात प्रवेश करतात. थेट रस्त्यापर्यंत उभ्या करण्यात येत असलेल्या दुचाकीमुळे येथे चालक, पादचारी यांची मोठीच अडचण होते. याच रस्त्यावर पुढे बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यालय आहे. बँकेच्या इमारतीतीत पार्किंगची सुविधा नसल्याने ग्राहक दुचाकी वाहने थेट रस्त्यापर्यंत लावतात आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. छत्रपती शिवाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शरद सहकारी बँकेचे व पुढे जनता सहकारी बँकेचे कार्यालय आहे. येथे देखील ग्राहक दुचाकी वाहने रस्त्यावर लावतात. शहरातील सय्यदवाडा परिसरातील रस्त्यावर कॅनरा बँकेचे कार्यालय आहे. या इमारतीत देखील पार्किंगची व्यवस्था नाही. ग्राहकांची वाहने थेट रस्त्यापर्यंत लावली जातात.
जुन्नर शहरातील रस्तेच बनलेत वाहनतळ
By admin | Published: May 24, 2017 3:56 AM