लोकमत न्यूज नेटवर्कमांजरी : मांजरी बुद्रुक येथील रस्त्याचे काम सुरू आहे. नियोजनाअभावी वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून, निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मांजरी बुद्रुक घुलेनगर ते गोपाळपट्टी येथील सध्या रस्त्याचे दोन किलोमीटरपर्यंत काम चालू आहे. परंतु रस्त्याचे काम करत असताना निकृष्ट दर्जाचे काम होत असून, भविष्यात पुन्हा याच रस्त्याची व ड्रेनेजलाइनची पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता नागरिक करत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असून, ड्रेनेजलाइन टाकण्यात आल्या आहेत. दोन्ही पाईपाचा मध्य व्यवस्थित जोडला नसल्याने भविष्यात ड्रेनेज पुन्हा लिकेज होऊन ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. तयार केलेला रस्ता पुन्हा खोदून ड्रेनेजलाईन दुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे होणाऱ्या रस्त्याचा खर्चही वाया जाणार आहे. त्यामुळे वेळीच झालेली चुकीची दुरुस्ती करून भविष्यातील होणारा त्रास व खर्च याला आळा बसेल. पुनावाला ग्रुप सीएसआरच्या माध्यमातून कामाला आर्थिक मदत होत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी एक चांगली बाब आहे. रस्ता करण्यासाठी एखादी संस्था मदत करते आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक झालेच पाहिजे; परंतु कंत्राटदाराच्या नियोजनाचा अभाव, रस्त्याचे व ड्रेनेजचे निकृष्ट दर्जाचे काम आणि अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत असल्याने कामाची पद्धत आणि वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. बांधकाम विभागाचे अभियंता नकुल रणसिंग यांना संपर्क केला असता ते म्हणाले ड्रेनेज लाईनला मध्यभागी जोडणारा जॉईंट हा व्यवस्थित जोडण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना, कामगारांना या ठिकाणी सतत वाहतूककोंडी होत असल्याने वेळेवर पोहोचता येत नाही, रस्त्याच्या बाजूला असलेल्या व्यापाऱ्यांच्या धंद्यावर परिणाम झाला आहे. अर्धा रस्ता फोडल्यामुळे दोन्हीकडून येणारी वाहतूक एकाच मार्गाने येत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. बसगाड्यांना तासन्तास थांबावे लागत आहे. या नकोशा वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांचे रस्त्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. त्यासाठी एकेरी वाहतूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा. तसेच एका बाजूची वाहने गेल्यास दुसऱ्या बाजूची वाहने सोडण्यात यावी, असे केल्यासच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील.
मांजरी बुद्रुक रस्त्यांची लागली वाट
By admin | Published: July 06, 2017 3:29 AM