शहरात अनेक रस्ते आणि फुटपाथ खोदून ठेवले आहेत. नागरिकांना चालताना अडथळे निर्माण होत असल्याने तुम्ही रस्ते आणि फुटपाथ खोदताय तर आम्हाला चालायला तरी जागा ठेवा. अशी मागणी पादचाऱ्यांकडून केली जात आहे.
पुणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण अथवा नवीन पाईपलाईन करण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. तर काही ठिकणी फुटपाथच्या नूतनीकरणासाठी त्या फरश्याही उकरल्या जात आहेत. परंतु याकामाला महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून विलंब होत असल्याने खोदलेले काम दिवसेंदिवस त्याच स्थितीत दिसून येत आहे. अशा वेळी आम्ही चालायचे कुठून असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरात मध्यवर्ती भागात रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाईपलाईनचे काम चालू आहे. तर काही रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम चालू आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर वाहतूक कोंडीही मोठया प्रमाणावर होत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही चालण्याचा त्रास होत आहे. महापालिका कर्मचारी नूतनीकरण अथवा पाईपलाईन बदलण्याचे काम करत असताना वाहने आणि पादचाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
मध्यवर्ती भागातील केळकर, शिवाजी आणि फर्ग्युसन रस्त्यावर सद्यस्थितीत खोदकाम करण्याचे काम चालू आहे. आता नेहमी वाहतूक कोंडी होत असते. तसेच नागरिकांनाही त्रास होत आहे. राजाराम पुलावरही फुटपाथच्या नूतनीकरणाचे काम चालू आहे.
राजाराम पूल भागातील संजय देशपांडे म्हणाले, गेल्या चार पाच दिवसापासून हे फुटपाथ खोदून ठेवले आहेत. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच सामान्य माणसालाही रस्त्यावरून चालावे लागत आहे. पुलावरून वाहने वेगाने जात असतात. रस्त्यावरून चालताना अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी फुटपाथची २ फुटात विभागणी करून काम सुरू ठेवावे. नागरिकांना चालण्यास जागा राहील.