पुणे: नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून कडक निर्बंधामुळे घरी बसून होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. त्यांनाही सकाळी 11 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. पुण्यात रुग्णसंख्या कमी झाल्याने काल महापालिकेने सर्व दुकानांना दुपारी 2 पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी दिली. तर 3 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच नागरिक बाहेर पडले होते. परंतु शहरातील मध्यवर्ती भागात रस्ते खोदल्याने त्यांना प्रचंड संताप झाल्याचे चित्र दिसून आले.
शहरातील अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रास्ता, दगडूशेठ मंदिर परिसर या गजबजलेल्या भागात अनेक ठिकाणी महापालिकेने रस्ते खोदाई करून ठेवली आहे. दोन महिन्यात कोणीही बाहेर पडत नसल्याने काम संथ गतीने चालू होते. पण आज नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. या मध्यवर्ती भागातच कपडे, चप्पल, दैनंदिन वस्तू, अशा वस्तूंचे मोठे मार्केट आहे. त्यामुळे येथे नेहमीच गर्दी होत असते.
रस्ते खोदल्याने रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहनांना कसरत करून जावे लागत होते. आता पाऊस सुरु झाल्याने सर्वत्र चिखलही झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी तर वाहतूककोंडी झाल्याचे चित्रही दिसून आले.
काम पूर्ण होणार कधी
दोन महिन्यापासून रस्त्याचे काम चालू आहे. रस्त्यावरून जाताना अनेक अडचणी येत आहेत. हे काम कधी पूर्ण होईल असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.