- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने बुधवारी सायंकाळी पुन्हा शहरात धुवाधार बरसात केली़ सुमार तासभर झालेल्या या पावसाने पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले़ सायंकाळच्या वेळी झालेल्या या पावसाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठी वाहतूककोंडी झाली होती़ जंगली महाराज रोडवर फुटपाथचे काम सुरू आहे़ त्यामुळे पाणी जाण्यासाठी वाटच नसल्याने संपूर्ण रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते़ सुमारे तासभर पडलेल्या या धुवाधार पावसाची वेधशाळेत साडेआठ वाजेपर्यंत ५१़८ मिमी नोंद झाली होती़ लोहगाव परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ दोन दिवसांपूर्वी मॉन्सूनच्या आगमनाबरोबर शहरात जोरदार पाऊस झाला होता़ या थोड्याच्या पावसाने शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते़ त्याविरुद्ध नगरसेवक व पुणेकरांनी आवाज उठविल्यावर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सदोष कामे झाली असल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते़ आयुक्तांनी पाहणी करण्यापूर्वीच बुधवारी झालेल्या पावसाने पुन्हा शहरातील रस्त्यांची तीच गत झाली़ वाघोली परिसरात दुपारी सव्वाचारच्या सुमारास सुमारे एक तास जोरदार पाऊस झाला़ या पावसाने पुणे -नगर रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते़ आळंदी रोडवरील आंबेडकर सोसायटीमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले़ काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी सिमेंटचे रस्ते करण्यात आले होते़ मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला़ रस्त्यावर पाणी आल्याने शहरातील मध्य भाग व महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती़ रात्री नऊनंतर वाहतूक सुरळीत झाली़ या पावसाने शहरात १८ ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या़ कोथरूडमधील रामबाग कॉलनीत दोन ठिकाणी घरात पाणी शिरले होते़ अग्निशामक दलाने नागरिकांना मदत करून बाहेर काढले़ आॅईल सांडल्याने रस्ते निसरडे झाल्याच्या १८ घटना घडल्या़ अग्निशामक दलाच्या जवानांनी तेथे जाऊन रस्त्यावर वाळू, माती टाकून साफसफाई केली़