पुणे : नागरिकांकडून मिळणारी माहिती किती महत्वाची ठरू शकते, याचे उदाहरण अलंकार पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले़. भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या. अशाप्रकारे त्या दोघी कर्वेनगरमधील स्वप्न मंदिर सोसायटीत रेकी करत होत्या़, तेथील नागरिकांना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे आपला संशय व्यक्त केला़. त्यानंतर अलंकार पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ९ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे़. अनु पवन आव्हाड(वय २५, रा़ वर्ल्ड ट्रेडसमोर, खराडी), प्रकाश अंबादास आव्हाड (वय ३४), पुजा प्रकाश आव्हाड/ पुजा दिलीप गुप्ता (वय ३८) अनिता कैलास बोर्डे (वय ४२, सर्व रा़ दिवा, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्याबरोबरच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे़. अंलकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५, डेक्कन २, शिवाजीनगर आणि ठाणे येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक अशा ९ दिवसा घरफोड्या उघडकीस आल्या असून त्यांच्याकडून ३३१ गॅ्रम वजनाचे सोने व ७ किलो ५३२ ग्रॅम चांदीच्या लगडी असा एकूण १४ लाख २९ हजार १६२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे़. त्यांच्याकडून दागिने विकत घेणाऱ्या मुबारक उमर खान (वय ४१, रा़ गोवंडी, मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे़. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ़ बसवराज तेली यांनी माहिती दिली़ ते म्हणाले, या महिला अगोदर जाऊन परिसरातील बंद बंगले कोणते आहेत़ याची रेकी करायच्या. त्यासाठी त्या भंगार विकत घेत असल्याचा बहाणा करत होत्या. बंगला खरंच बंद आहे का याची खात्री करण्यासाठी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने आत जात असत. बंगला बंद दिसल्यावर त्या तिघी आपला साथीदार व लहान मुलांना बोलावून घेत असत़. बंगल्याचे पुढच्या दाराऐवजी मागच्या बाजूला असलेले किचनचे दार, खिडकीचे गज वाकवून त्यातून लहान मुलाला आत पाठवत़. त्यानंतर तो मुलगा दरवाजा उघडून त्यांना आत घेत़. घरातील सोन्याचे दागदागिने चोरल्यानंतर आल्या वाटे ते परत जात असत़. त्यामुळे तेथे चोरी झाल्याचे बाहेरुन कोणाला समजत नसे़. महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याचदिवशी एका ठिकाणी घरफोडी झाली होती़. तीसुध्दा यांनीच केली असावी अशा संशयावरुन ते ठिकाणी आणि यांचे मोबाईलचे लोकेशन पडताळून पाहिल्यावर लक्षात आले़. त्यातून खोलात जाऊन चौकशी केल्यावर त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली़. पोलीस उपायुक्त डॉ़. बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, उपनिरीक्षक अंबरिश देशमुख, राजेंद्र सोनावणे तसेच पोलीस कर्मचारी नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबुलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांनी ही कामगिरी केली़.
नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी करणाऱ्या महिला जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 3:02 PM
भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या दोघी बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या.
ठळक मुद्देअलंकार पोलिसांची कामगिरी : १४ लाखांचा ऐवज जप्तचौकशीत ९ घरफोड्या केल्याचे उघडकीस