ओतूर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जुन्या बसस्थानकावर दोन तरुणांनी पोलिस असल्याचे सांगून एवढे सोने अंगावर घालून कशाला फिरता, आम्ही संशयितांना आडवून चेक करीत असतो, तुम्ही सोन्याच्या अंगठ्या, चैन असे घालू नका, असे त्यांनी सांगितले. रुमाल काढा व त्यात तुमच्या अंगावरील सोने काढून खिशात ठेवा, अशी बतावणी दोघा भामट्यांनी करून वृद्धास ३ सोन्याच्या अंगठ्या व १ सोनसाखळी रुमालात ठेवण्यास सांगितले.
त्यावेळी हातचलाखीने सोने लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. २२) सकाळी ८:४५ च्या दरम्यान ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात घडली. याबाबत बबन विठ्ठल नलावडे (वय ७७, रा. धोलवड भवानीनगर, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलिसांत फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस नाईक बाळशीराम भवारी करीत आहेत.