पुणे : येरवडा कारागृह हे गुन्हेगारांची शाळा झाल्याचे बोलले जाते. एखाद्या गुन्ह्यात कारागृहात आल्यानंतर एकमेकांशी झालेल्या ओळखीतून बाहेर आल्यावर ते टोळी बनवून मोठे गुन्हे करू लागतात, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. लिफ्ट देण्याचा बहाणा करून प्रवाशांना लुटणा-या ५ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.अशोक गणपत बनसोडे (वय ३४, रा़ गोंधळेनगर, हडपसर, मुळ गाव लातूर), मोहसीन आयुब पठाण (वय २६, रा़ गॅलेक्सी, कौसरबाग, कोंढवा), आरबास युनूस पठाण (वय२६, रा़ सय्यदनगर, हडपसर), मुकेश कांतीलाल चव्हाण (वय२२, रा़ बनकर कॉलनी, सातववाडी, हडपसर), निखिल रवींद्र बामणे (वय २३, रा़ जुनी वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून १४ गुन्हे उघडकीस आले असून त्याकडून २ लॅपटॉप, १२ मोबाईल, २ सोन्याच्या अंगठ्या, १ सोन्याची चैन, मोटारसायकल, स्कॉडा कार, दोन बनावट नंबरप्लेट, १ कुकरी, १ चाकू, प्रवाशांची ओळखपत्रे असा १५ लाख ३५ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे़याबाबत पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे यांनी माहिती दिली़ अशोक बनसोडे याच्याविरुद्ध लातूर, पुणे शहर व दिडोंशी याठिकाणी खुन, चोरी, विनयभंग असे ८ गुन्हे दाखल होते़ बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यात अशोक बनसोडे, प्रविण चव्हाण व निखिल बामणे हे शिक्षा भोगत असताना त्यांची ओळख झाली़ अशोक बनसोडेची शिक्षा भोगून झाल्यावर तो बाहेर आला़ प्रविण चव्हाण याच्या ओळखीने प्रविणचा भाऊ मुकेश चव्हाण याला पुण्यात भेटला़ मुकेशने त्याला एक मोबाईल व मित्राची मोटारसायकल देऊन रहायची सोय केली़ नंतर निखिल बामणे हा शिक्षा भोगून बाहेर आला़ १६ नोव्हेंबरला ते चोरी करण्यासाठी जात असताना शिवाजीनगर येथे एका स्कॉडा कारला चावी तशीच ठेवलेली दिसली़ चावी घेऊन नंतर रात्री त्यांनी ती कार चोरली़ तिच्यावर आर्मी असे लिहून नंबरप्लेट बदलली़ त्यानंतर ते पुणे स्टेशन येथे आले़ तेथे मुंबईला जाणाºया एका प्रवाशाला लिफ्ट दिली व वाटेत त्याला लुटले़ अशाप्रकारे त्यांनी गेल्या १७ दिवसात १४ गुन्हे केले होते़ त्याची नोंद बंडगार्डन, येरवडा, हिंजवडी, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर, खेड, विरार, हडपसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम मोरे, निरीक्षक रवींद्र बाबर, सहायक निरीक्षक एऩ बी़ भोसले, उपनिरीक्षक अशोक भोसले, रोहीदास लवांडे, गुणशिंलन रंगम, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, अतुल साठे, गजानन गणबोटे, अजिनाथ काळे, संदीप तळेकर, कल्पेश बनसोडे, महेंद्र पवार, संदीप राठोड, सुजित पवार यांनी केली आहे.शिवाजीनगर येथून त्यांनी स्कॉडा गाडी चोरल्यानंतर तिचा शोध घेत असताना शहरातील विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये ही गाडी दिसून आली़ विविध चेकनाका, टोलनाक्यावर ही गाडी दिसली़ पोलिसांनी तिचा माग अगदी नाशिकपर्यंत घेतला़ नाशिक येथील सापुतारा घाटात त्यांनी ही स्कॉडा कार सोडून दिली होती़ अनेकांनी लिफ्टचा बहाणा करुन आपल्याला लुटल्याबद्दल पोलिसांकडे फिर्यादही दाखल केली नव्हती़ चोरट्यांकडे मिळालेल्या मोबाईलवरुन पोलिसांनी फिर्यादींचा शोध घेतला़ त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़
लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारे जेरबंद, ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 8:57 PM