पिंपरी : मध्य प्रदेश येथील दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घातली. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता नऊ आरोपींना पकडले. तर दोघे पळून गेले. मावळ तालुक्यातील उर्से टोलनाक्यावर गुरुवारी (दि. २०) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
लोकेश चौहान (वय ३५), भवानी हनुमंत चौहान (वय ४०), निखिल घेकरसिंग गोडन (वय ३४), कमलसिंग सुघनसिंग हाडा (वय ६१), अंतिम कल्याण सिसोदिया (वय २३) कुंदन चौहान (वय ३३), अरविंद चौहान (वय ३५), संजय गुदेन (वय ३२), बॉबी बबिल धर्मराज झाजा (वय २४, सर्व रा. देवास, मध्यप्रदेश), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, दोनजण डोंगरात पळून गेले. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी शुभम कदम यात जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार दोन वाहनांतून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उर्से टोलनाक्यावर सापळा रचून संशयित वाहनांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्या. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता सहा आरोपींना ताब्यात घेतले. इतर आरोपींनी महामार्गावरून गाडी दामटली. पोलिसांनी आरोपींच्या गाडीचा पाठलाग केला. त्यामुळे गाडी सोडून आरोपींनी डोंगरात पळ काढला. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्यासह गुंडा विरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी डोंगरात लपून बसलेल्या तीन आरोपींना पकडले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या दोन साथीदाराचा शोध सुरू होता.
शुभम कदम थोडक्यात बचावले
आरोपींनी गाडी अंगावर घातली तरी पोलीस कर्मचारी कदम मागे यांनी मागे न हटता गाडीचे बोनट धरले. त्यामुळे आरोपींनी गाडी दामटली. त्यावेळी कदम गाडीच्या दोन चाकांच्या मधोमध खाली पडले. त्यांच्या अंगावरून मोटार पुढे गेली. यात ते थोडक्यात बचावले.