पुणे : सोनसाखळी चोरट्यांना जरब बसविण्यात यश आल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असताना रविवारी पिंपरीसह शहरात सहा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. यात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. त्यामुळे पुन्हा एकदा सोनसाखळी चोरट्यांचा ‘बंदोबस्त’ करण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागणार, असे दिसते.रविवारी दिवसभरात धायरी, वडगाव बु., वारजे माळवाडी, स्वारगेट, धनकवडी आणि पिंपरी भागात या घटना घडल्या. त्यापैकी पाच घटनांमधील महिला या पन्नाशीच्या पुढच्या आहेत, तर चार घटना दुपारी ३ ते ५ च्यादरम्यान घडल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पोलिसांकडे नोंद झालेली पहिली घटना धनकवडीतील तीन हत्ती चौकात सकाळी १०.२० वाजता घडली. पायी जात असलेल्या ५६ वर्षीय महिलेला टार्गेट करीत चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील २ लाख २ हजार ५०० रुपयांच्या दोन सोनसाखळी लांबविल्या. दुसरी घटना स्वारगेट परिसरातील सिटी इंटरनॅशनल स्कूल रस्त्यावर घडली. या घटनेत चोरट्यांनी कर्वेनगर येथे राहणाऱ्या ७१ वर्षीय महिलेच्या गळ््यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली. वडगाव बु. येथे घडलेल्या तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेला टार्गेट केले. त्या दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सनसिटीमधील चंद्रमा सोसायटीसमोरून जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ््यातील ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरून नेली. याच सुमारास धायरी येथे सोनसाखळी चोरीची चौथी घटना घडली. एका ५० वर्षीय महिलेच्या गळ््यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविली. या महिला बसमधून उतरून घरी जात असताना धायरीतील बेनकर वस्तीजवळ चोरट्यांनी त्यांना टार्गेट केले. वारजे माळवाडी येथील ज्ञानेश्वरी उद्यानासमोर चोरट्यांनी ५६ वर्षीय महिलेच्या गळ््यातील ५२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली.ही घटना दुपारी ४.५० वाजण्याच्या सुमारास घडली. ही शहरातील सोनसाखळी चोरीची पाचवी घटना ठरली. सहाव्या घटनेत चोरट्यांनी पिंपरीत ४८ हजारांची सोनसाखळी चोरली. (प्रतिनिधी)
चोरट्यांनी लुटले ‘सोने’
By admin | Published: March 08, 2016 1:25 AM