मंचर: आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे बांधनवस्तीवर अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पती, पत्नी व आई अशा तिघांना बेदम मारहाण केली आहे. तसेच पाच तोळे सोने व २५ हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना सोमवारी ( दि.१४) पहाटे घडली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी पुण्यात उपचार सुरु आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणी पाबळ रस्त्यावर लोणी गावच्या हद्दीत नाना दगडु आदक (वय ६०) पत्नी मिरा (वय ५५) व आई यमुना दगडु आदक ( वय 90 )असे तिघेजण राहतात. सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दरवाजाचा आवाज नाना यांना आला. कुत्र्याने दरवाजा वाजवला असेल असे समजून त्यांनी दरवाजा उघडला.त्यावेळी दरवाजात उभ्या असलेल्या अज्ञात चोरट्याने आदक यांच्या डोक्यावर लोखंडी सळईने फटका मारला.या हल्ल्यात ते कोसळुन खाली पडले. त्यानंतर चोरांनी घरात प्रवेश करुन फिर्यादी यांच्या पत्नी, आई यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, घेतले. तसेच मिरा आदक यांच्या कानातील सोन्याच्या कुड्या तर अक्षरश: ओरबाडुन घेतल्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत होऊन तो तुटला आहे. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटातून 25 हजार रुपये व सोने चोरुन नेले.
यावेळी नाना आदक व महिलांनी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून जवळच राहणारे नवनाथ शिंदे मदतीसाठी धावले.चोरीची घटना पाहिल्यानंतर त्यांनी गावातील इतरांना मदतीसाठी बोलावले. लोणी गावतंटामुक्त समितीचे अध्यक्ष पिंटु पडवळ व अनिल आदक यांनी नानाभाऊ दगडू आदक व मिरा आदक यांना पुणे येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले आहे. तेथे दोघांवर उपचार सुरु आहे. चोरट्यांची संख्या चार होती असे सांगितले जात आहे.
अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील,उपविभागिय पोलिस आधिकारी अनिल लंभाते,सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार व पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.पोलिसांनी पंचनामा केला आहे. पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले,पोलिस पाटील संदिप आढाव यांनीही भेट दिली आहे.चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.