शेलपिंपळगाव : चिंचोशी (ता. खेड) येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत दरोडेखोरांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपींनी बहुळ हद्दीत एका दांपत्याला चाकूचा धाक दाखवून लुटले होते. तर काही महिन्यांपूर्वी शेलपिंपळगाव येथे पोलीस शिपायाच्या घरी दरोडा टाकून संबंधित पोलीस शिपायावर धारदार कोयत्याने हल्ला करणारे हेच दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मात्र घटनेनंतर हे दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी होत होते. दरम्यान सोमवारी (दि. ३) मध्यरात्री पोलीस व दरोडेखोरांमध्ये सुमारे २० मिनिटे झटापट झाली. यामध्ये एका दरोडेखोराने थेट पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. घटनेत पोलीस अधिकारी जखमी झाले. मात्र खेडच्या पूर्व भागातील गावांमध्ये नित्याने पडणाऱ्या दरोड्यांमधील सराईत गुन्हेगार जेरबंद झाल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे. शेलपिंपळगाव येथे १० ऑक्टोंबर २०२४ रोजी घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी कपाटातून ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोने लंपास केले होते. तर चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस शिपायावर संबंधित चोरट्यांनी धारदार कोयत्याने हल्ला चढवून पोलीस शिपायाला गंभीर जखमी केले होते. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली तेव्हा पाच ते सहा चोरटे दिसून आले होते. बहुळ (ता. खेड) येथे मागील आठवड्यात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली होती. घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने दांपत्यावर जीवघेणा हल्ला चढवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली त्यावेळी पाच ते सहा चोरटे असल्याचे निष्पन्न झाले होते. शेलगाव (ता. खेड) येथे ५ सप्टेंबर २०२४ रोजी अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरातील कपाटातून रोख सहा लाख रुपये व सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तसेच शेलपिंपळगाव येथे चार वर्षांपूर्वी अज्ञात दरोडेखोरांच्या टोळक्याने लोखंडी रॉडच्या साह्याने घराचा दरवाजा तोडून घरातील लोकांना पिस्तुल, कोयता, लोखंडी गज, काठी आदी धारदार शस्रांनी मारहाण करून घरातील रोख २ लाख ७० हजार रुपये व साडेचार तोळे सोने असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. या दोन्हीही घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान हाती लागलेले सराईत दरोडेखोरांचा या घटनेत समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दोन - तीन दिवसांपूर्वी करंदी (ता. शिरूर) परिसरात देखील मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिकांना चोरट्यांचे टोळके आढळून आले होते. एकत्रित आवाज दिल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढल्याचे स्थानिकांनी सांगितले.