लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या पथकाने अटक केली आहे.
अमरसिंग जगरसिंग टाक (रा. गोसावीवस्ती, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून मोटार, दुचाकी व दागिने असा ६ लाख ४५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत नुकतेच युनिट-६च्या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक पेट्रोलिंग करीत असताना घरफोडी आणि वाहनचोरी करणारा सराईत अमरसिंग टाकला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लोणी काळभोर परिसरातून साथीदार जयपालसिंग ऊर्फ मोन्यासिंग टाक याच्या मदतीने तरुणाची मोटार जबरदस्तीने चोरून नेल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत अमरसिंग याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, मच्छिंद्र वाळके, राहुल माने, नितीन मुंढे, ऋषिकेश टिळेकर, प्रतीक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, संजय देशमुख यांच्या पथकाने केली.