पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर रॅली काढून उर्से टोलनाक्यावर दहशत माजवली म्हणून कुख्यात गुंड गजा मारणे आणि साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी टोलनाक्यावरील दुकानातून पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाल्यावर गुंड गजानन मारणे याने मिरवणूक काढली. त्यात वाहनांचा मोठा ताफा होता. हा ताफा उर्से टोलनाक्यावर आला त्यावेळी मारणे याच्या समर्थकांनी आरडाओरडा करून फटाके वाजवले. तसेच ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करून दहशत माजवली. याप्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. त्यावेळी इतर वाहनांना बाजूला करून टोल न देता वाहने घेऊन गेले. तत्पूर्वी टोलनाक्यावरील फुड मॉलमध्ये पाण्याच्या बाटल्या व वडापाव पैसे न देता जबरदस्तीने घेतल्याचे समोर आले आहे. त्यावरून गजा मारणेसह साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला.
पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून मारणे व त्याच्या साथीदारांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.