लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना सहज व केव्हाही व कुठेही सातबारा उपलब्ध व्हावा म्हणून डिजिटल सातबाऱ्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शासनाच्या नियमानुसार २५ रुपयांमध्ये कोणत्याही संगणकावर अथवा मोबाईलदेखील ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करता येतो. परंतु, पुणे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी खाजगी संगणकचालक नागरिकांकडून एका डिजिटल सातबाऱ्यासाठी ५० किंवा त्याहून अधिक पैसे वसूल करत आहेत. यामुळे एक प्रकारे नागरिकांची फसवणूक सुरू असून, शासनाने यासंदर्भात कडक निर्बंध घालण्याची मागणी केली जात आहे.
राज्यात एकूण सातबाऱ्याची संख्या अडीच कोटींच्या घरात असून, शंभर टक्के सातबारे डिजिटल स्वाक्षरीसह शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकांना कोठेही आणि पाहिजे तेव्हा सहज पध्दतीने डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध व्हावा म्हणून महाभूमी पोर्टलवर शंभर टक्के सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहे. शासनाच्या महाभूमी पोर्टलवर ओटीपी टाकून लाॅगीन केल्यानंतर व शासनाने निश्चित केलेली रक्कम भरल्यानंतर हा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध होऊ शकतो. परंतु, सर्व सर्वसामान्य लोक खाजगी संगणक चालकाकडे जाऊनच डिजिटल स्वाक्षरीत सातबारा काढून घेतात. यासाठी २५ रुपये घेणे अपेक्षित असताना ५० रुपये किंवा त्याहून अधिक पैसे घेतले जात आहेत.
--
तुम्हीदेखील काढू शकता अशा प्रकारे सातबारा
शासनाच्या https:/ digitalsatbara.mahabhumi.gov.in संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारा नागरिकांना डाऊनलोड करून घेता येतो. महाभूमी पोर्टलवर गेल्यानंतर ओटीपी बेस येईल. त्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमची नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर आणि ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर तत्काळ सातबारा उतारा डाऊनलोड होतो.