चाकण : वाकी ( ता.खेड ) येथील टाटा कंपनीच्या गोदामातून स्पेअर पार्टचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरला दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी मोटारसायकल आडवी लावली. नंतर कंटेनर रोहकल गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन लुटल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकासह तीन चौघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली. याप्रकरणी कंटेनरचा चालक अंकुश लक्ष्मण केंद्रे ( वय.४०,रा.शिरसटवाडी,लातूर ) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार विनोद साहेबराव ठाकरे ( वय २८ रा. मेदनकरवाड़ी वेद हाईटस, प्लेंट नं. ए. /६ चाकण ), जितेंद्र रामभवन श्रीवास ( वय ३० , रा. आयटेल होम, चाकण ), रियाज अमीन इनामदार ( वय. २४ ,रा.ठाकुर पिंपरी ता.खेड ) यांच्यासह म्हाळुंगे पोलीस चौकीत नेमणुकीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे कंटेनरमध्ये ( एमएच १२ पीके ५३०१) वाकी येथील टाटा कंपनीच्या गोदामातून स्पेअर पार्ट भरून रोहकल येथील सेफा एक्सप्रेस प्रा. लि. या कंपनीच्या गोदामामध्ये खाली करण्यासाठी जात असताना अचानक मोटार सायकलवरून आलेल्या अनोळखी चौघांनी कंटेनरला कट मारून मोटार सायकल आडवी लावली. तसेच जबरदस्तीने कंटेनर निर्जनस्थळी नेऊन त्यातील टाटा कंपनीचे २७ लाख ९ हजार ४६९ किंमतीचे स्पेअर पार्ट व फिर्यादी जवळील १५०० रोख रक्कम असा ऐवजाची चोरी केली.
संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने आरोपींना गुन्हा कसा करायचा? दरोड्याच्या मुद्देमालाची विल्हेवाट कशी व कोठे लावायची ? अशाप्रकारे दरोडयाची आखणी केली. तसेच वरील आरोपींबरोबर गुन्हा घडण्याचे पूर्वी व गुन्हा घडल्यानंतर मोबाईलवर बोलणे झाले असल्याचे देखील तांत्रिक तपासात समोर आल्याचे समजताच पासलकर फरार झाला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ,सहा.पोलीस आयुक्त रामचंद जाधव मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे हे करत आहेत.------------------------------------------------------