लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोड परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने अटक केले. त्यांच्या ताब्यातून ३ गावठी पिस्तुले, ५ काडतुसे, ३ दुचाकी, ४ मोबाईल, नायलॉनची दोरी व रोख रक्कम असा ३ लाख ७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे
किरण शिवाजी खवळे (वय २२, रा. निगडी), विल्यम्स जॉन पिटर (वय २२, रा. किरकिटवाडी), वैभव राजू खिरीट (वय २४, रा. गोऱ्हे बु), आकाश गोपीनाथ मते (वय २३, रा. कोल्हेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे.
गुन्हे शाखेचे पथक सिंहगड रोड परिसरात गस्तीवर असताना, कर्मचारी क्षीरसागर व मारणे यांना बातमी मिळाली होती की, सिंहगड रोड परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एक टोळी एकत्र आलेले आहे. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा लावला. त्यावेळी दोन व्यक्ती बोलताना दिसून आल्या. त्या म्हणत होत्या, मी मॅनेजरला पिस्तुलाचा धाक दाखवतो. त्यानंतर इशारा करताच पंपावरील सर्व रोकड ताब्यात घ्या. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करून अंगझडती घेतली असता, मोठा शस्त्रसाठा मिळून आला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहायक निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, कर्मचारी संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर यांच्या पथकाने केली.