जेजुरी : जेजुरी-बारामती रस्त्यावर रात्री बाराच्या सुमारास एका मोटारीचा स्पोटर््स बाईकवर पाठलाग करून मोटारमालकाला अडवून मारहाण करून त्यांची लूटमार करून पळून जाणाऱ्या टोळीला जेजुरी पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.
प्रशांत संजय गायकवाड (वय २५), कैलास हरीश बनसोडे (वय २५, रा. हडपसर), मयूर विजय गुंजाळ (रा. गंगानगर, फुरसुंगी), तसेच एका १७ वर्षांच्या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : १ आॅक्टोबरला रात्री १२ च्या सुमारास बारामती येथील विजय माधव शिंदे आपल्या मोटारीने जेजुरीहून बारामतीकडे जात होते. दोन दुचाकीवरील चौघे जण आपला पाठलाग करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील एका पेट्रोलपंपाजवळ आश्रयासाठी गाडी थांबविली. तेवढ्यात स्पोटर््स बाईकवाल्यांनी दुचाकी आडवी घालून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैशाचे पाकीट व मोबाईल जबरदस्तीने काढून घेत हे चौघे चोरटे पळून गेले. विजय शिंदे यांनी झालेल्या प्रकाराबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, भोर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे, विजय वाघमारे, पोलीस हवालदार शिवा खोकले, मुन्ना मुत्तनवार, दीपक वारुळे, अप्पा पड्याळ, रणजित निगडे, संतोष मेढेकर, संतोष अर्जुन, अक्षय यादव, महेश उगले, किसन कानतोडे, अजय अवघडे, कौंतेय खराडे यांनी सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांच्या मदतीने बारामती, फलटण, हडपसर भागात कसून शोध घेऊन तिघांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह अडीच लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले असता या तिघा आरोपींना पोलीस कस्टडी सुनाविण्यात आली आहे. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अंकुश माने यांनी व्यक्त केली आहे.