पुणे : पालखीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन मोबाईल, सोनसाखळी, पाकीटमारी करणाऱ्या अहमदनगरच्या सहा जणांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे़. मोहन गोरख काळे (वय २७, रा़ राजेवाडी, ता़ जामखेड), सागर नवनाथ गिते (वय १८, रा़ बाभुळगाव, ता. पाथर्डी), अमोल बाबासाहेब गिते (वय २१, रा़ लोहसर, खाडगाव, ता़ पाथर्डी), रामेश्वर अंबादास जाधव (वय २२, रा़ शिरापूर, ता़ शिरूर कासार, जि़ बीड), धर्मराज मारुती मुंजाळ (वय ३८, रा. शिवनी, ता़ वडवाणी), हिरालाल सुखदेव जाधव (वय ३५, रा़ भोरवाडी, ता़ पाथर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. त्यांच्याकडून २ तोळ्यांची सोनसाखळी, आयफोन मोबाईल व साधा मोबाईल असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की लष्कर पोलीस ठाण्याचे तपास पथक पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना हवालदार गणपत थिकोळे यांना माहिती मिळाली़. त्यानुसार कॅम्पमधील महावीर चौकात जाऊन त्यांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले़. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोबाईल, सोनसाखळी मिळून आली़. अधिक चौकशी केली असता त्यांनी पालखी सोहळ्यामध्ये विश्रांतवाडी, समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गुन्हे केल्याची कबुली दिली़. ते सर्वजण एकत्र घोळक्याने फिरतात़. गर्दीमध्ये एखाद्याला हेरून त्याच्याकडील मोबाईल, सोनसाखळी अथवा पाकीट मारून ते आपल्या साथीदाराकडे पास करतात़. ही चोरी करत असताना कोणाच्या लक्षात येण्याच्या आत ते साथीदाराकडे चोरलेली वस्तू पास करत असल्याने कोणाच्या लक्षात येत नव्हते़ .अधिक तपासासाठी त्यांना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश सोनवणे, हवालदार शैलेश जगताप, गणपत थिकोळे, प्रदीप शितोळे, अमोल शिंदे, अमोल राऊत, पवन भोसले, राहुल शिंगे, सागर हुवाळे, आबासाहेब धावडे, मुशरफ पठाण यांनी ही कामगिरी केली आहे़.
पालखीत चोऱ्या करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 9:31 PM
पालखीच्या गर्दीमध्ये एखाद्याला हेरून त्याच्याकडील मोबाईल, सोनसाखळी अथवा पाकीट मारून ते आपल्या साथीदाराकडे पास करतात़.
ठळक मुद्देअहमदनगरचे टोळके : एक लाखांचा ऐवज जप्त