लोणी काळभोर : कोयत्याचा धाक दाखवून व मारहाण करून पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनचालकांना लुबाडणाऱ्या टोळीतील ३ तरुणांना लोणी काळभोर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले. गुन्हा घडल्यापासून आठव्या दिवशी पुणे शहरात सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले. या प्रकरणी सुनील बबन जमदाडे (वय ३०, रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) या टेंपोचालकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शाहरूख रहिम शेख (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे), महेश बबन गजेसिंह (वय २२) व प्रवीण हनुमंत घाडगे (वय २१, दोघेही रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) या तिघांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुनील जमदाडे १५ आॅक्टोबर रोजी टेंपोत श्रीगोंदा येथून सिमेंटचे पाईप भरून ते श्रीवर्धन (जि. रायगड) येथे पोहोचविण्यासाठी निघाले होते. गाडी सोरतापवाडी गावच्या हद्दीत आली असता टेम्पोचा मागील टायर फुटला. गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन दोघांनी टायर बदलण्याचे काम सुरू केले. त्या वेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमदाडे व भापकर यांना कोयत्याचा धाक दाखवून व कोयत्याने मारहाण करून, रोख साडेसात हजार रुपये व दोन मोबाईल असा एकूण अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन ते फरारी झाले. त्यानंतर सुनील जमदाडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांनी हे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले. त्यांच्यावर पुणे शहर व ग्रामीण भागात गुन्हे दाखल असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. इतरही गुन्हे उघड व्हायची शक्यता आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकांकडे सोपवला. या शाखेचे प्रमुख उपनिरीक्षक दिलीप पवार, हवालदार समीर चमनशेख, रॉकी देवकाते, स्वप्निल अहिवळे, बाळासाहेब चोरामले, संतोष साठे, शंकर साळुंखे, प्रिया पवार यांच्या पथकाने तातडीने सोलापूरपर्यंत आरोपींचा शोध घेतला. परंतु यश मिळाले नाही. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची दिशा बदलली. खबऱ्यांमार्फत पुणे शहरातील आरोपींविषयी माहिती मिळाली. पोलीस पथक तातडीने तेथे गेले. पोलीस आपल्या मागावर आले असल्याची चाहूल लागताच या तिघाही आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. परंतु पोलीस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग तिघांना जेरबंद केले.
महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद
By admin | Published: October 25, 2016 6:02 AM