पुणे: कोरोना विषयक नियमावलीचा आधार घेत शहरातील काही प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. बाटलीबंद पाण्याची सक्ती ग्राहकांना केली जात असून सुरक्षित अंतर ठेवायचे या नियमामाला मात्र सोयीस्कर हरताळ फासला जात आहे.
फर्ग्यूसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या ठिकाणच्या काही प्रसिद्ध हॉटेल्समध्ये असा प्रकार होत आहे. ग्राहकांना पिण्यासाठी ग्लासमधून पाणी देण्याचे या हॉटेलचालकांनी बंदच केले आहे. त्याऐवजी १० रूपये किंमत असलेले बाटलीबंद पाणी ग्राहकासमोर ठेवले जाते. त्याची काहीच माहिती नसल्याने अनेकजण ते पाणी पितात व नंतर त्याची किंमत बिलात लावली जाते. चहा प्यायला तरीही त्याबरोबर पाणीही विकतच घ्यायला लागते.या बाटलीत फक्त अर्धा लिटर पाणी असते. तेही थंड दिले जात नाही. खाण्यासाठी काही मागवले तर एकापेक्षा जास्त बाटल्या लागतात. प्रत्येक बाटलीसाठी १० रूपये आकारले जातात. ते थेट बिलातच दिसतात. वेटर्सकडून ग्राहकांना पाणी विकत आहे वगैरे पुर्वकल्पना दिली जात नाही. कोणी विचारणा केली तर केंद्र व राज्य सरकारने कोरोनापासून बचावासाठी काही नियम लागू केले आहे. त्यात हॉटेलमध्ये सुटे पाणी, ग्लास ठेवले जाणार नाहीत असे ठळकपणे लिहिलेले आहे असे वेटरकडून सांगण्यात येते.केंद्र व राज्य सरकारच्या याच नियमावलीत ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे असाही नियम आहे. त्याकडे मात्र बाटलीबंद पाण्याची सक्ती करणाºया हॉटेल व्यावसायिकांकडून या नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ग्राहकांची गर्दी असल्यामुळे प्रत्येक टेबल वापरले जाते. हॉटेलच्या मागील, पुढील एरवी मोकळ्या असलेल भागातही टेबल टाकून संख्या वाढवलेली आहे. फर्ग्यूसन रस्त्यावरच्या काही व्यावसायिकांकडून मात्र सुरक्षित अंतर या नियमाचे काटेकोर पालन करत त्याशिवाय ग्राहक आल्यानंतर प्रत्येक वेळी खुर्ची सॅनिटायझरने स्वच्छही करून घेतली जात आहे. या हॉटेलमध्ये पाणी बंद बाटलीतच आहे, पण ते विनामुल्य आहे.
......पाण्याच्या बाबतीत केंद्र सरकारच्या नियमावलीत ठळक उल्लेख आहे. पाण्याचे ग्लास, जग व त्याची सतत हाताळणी यामधून संसर्ग होण्याची शक्यता असल्यानेच बाटलीबंद पाण्याचा नियम केला आहे. हॉटेलचालकांना कसलाही धोका पत्करायचा नाही किंवा नियमात अडकायचे नाही त्यांच्याकडून बाटलीबंद पाण्याची सक्ती केली जाते. सुरक्षित अंतर नसेल तर प्रशासनाने कारवाई करावी.- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेल ओनर्स असोसिएशन
ग्राहकांची मर्जी हेच याचे खरे उत्तर आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये प्यायचे पाणी मिळणार हे गृहित धरलेले असते. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागते. काही व्यावसायिक ती घेत असतील तर त्यांना प्रतिबंध करता येणार नाही.- किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन