आळेफाटा (पुणे) : टेंभेवस्ती (बेल्हे) येथे बुधवारी (दि. २२) मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडा पडला. यात पाच दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घरातील महिला-पुरुष, आबालवृद्धांना चाकूचा धाक दाखवून घरातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनेश पंडित पिंगट हे टेंभेवस्ती (बेल्हे) येथे कुटुंबासमवेत राहतात. ते व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मंगळवारी रात्री १० वाजता झोपले असता, मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी दिनेश व त्यांचा भाऊ गणेश यांच्या रूमचे दरवाजे कटावणीने तोडून आत प्रवेश केला. पिंगट बंधू व घरातील सदस्य जागे झाले असता चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत आरडाओरडा करू नका, गप सगळे काढून द्या, नाही दिले तर जीवे ठार मारण्याची धमकी देत घरात उचकापाचक करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. जाताना बाहेरून कडी लावत चोरटे पसार झाले. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घराची कडी उघडल्यानंतर पिंगट बंधूंनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, तिघांच्या अंगात काळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, तोंडास चाॅकलेटी काळसर रंगाचा मफलर, पायात बूट व अंगाने मजबूत बांध्याचे, एकाच्या हातात कटावणी, दुसऱ्याच्या हातात चाकू, तिसऱ्याच्या हातात एक हत्यार, अन्य दोघांच्या अंगात चाॅकलेटी रंगाचे स्वेटर, काळ्या रंगाची नाईट पॅन्ट, तोंडास चाॅकलेटी काळसर रंगाचा मफलर, पायात बूट व हातात काठ्या असा वेश पाच दरोडेखोरांनी परिधान केला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.