लोणी काळभोर : थेऊर येथे बंद खोल्यांच्या दरवाजे तोडत साडेपंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी( दि.१७ ) रोजी पहाटे ४-३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या चोरीप्रकरणी तुकाराम दगडू काकडे ( वय ५९, रा. काकडे मळा, थेऊर, ता. हवेली ) यांनी फिर्याद दिली आहे. काकडे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने ते आपली पत्नी पुष्पा, मुलगा विनोद व सुन रेश्मा यांच्यासमवेत शेजारील खोल्यांत राहत आहे. शेजारी त्यांच्या शेजारी शेतात काम करणारे हनुमंत हवालदार व लक्ष्मण थिटे हे कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचा दुसरा मुलगा थेऊरचे माजी सरपंच नवनाथ काकडे हे आपल्या मुलांबाळांसह पुणे कॅम्प येथे राहतात. मुलगा विनोद १६ मार्च रोजी पत्नीला घेऊन पुणे येथे दवाखान्यात गेला होता. ऊशीर झाल्याने तो भाऊ नवनाथ यांच्याकडे राहिला. घटनेच्या दिवशी तुकाराम काकडे व त्यांची पत्नी रात्री १० वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर झोपले. त्यापूर्वी त्यांनी स्वयंपाकघर व त्यांचा मुलगा विनोद पुण्याला मुक्कामी राहिल्याने त्याची खोलीला कुलूप लावले होते. परंतु, शनिवारी पहाटे ४ - ३० वाजण्याच्या सुमारास तुकाराम काकडे नेहमीप्रमाणे उठले व दरवाजा उघडण्यास गेले. परंतू,बाहेरून कडी लावल्याने तो उघडला नाही. म्हणून त्यांनी शेजारी राहत असलेल्या हनुमंत हवालदार यांच्याशी संपर्क साधला व दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यांचाही बाहेरून दरवाजा लावल्याने उघडत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काकडे यांनी दुसरा कामगार बाबा कवठे याला संपर्क साधला. त्याने सर्व खोल्यांच्या कड्या उघडल्या.काकडे यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता त्यांना खोली क्रमांक १, ३, ५, ६ या चार खोल्यांच्या दरवाजाचे कडी व कोयंडे तुटलेले, दरवाजे अर्धवट उघडे अवस्थेत आणि खोल्यातील सगळे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरफोडी झाली असल्याची खात्री पटल्यानंतर सदर घटनेविषयी त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता पत्नी पुष्पा खोली क्रमांक १ मधून मोहनमाळ, मुलगा विनोद याच्या खोली क्रमांक २ मधून दोन साखळ्या , ५ अंगठ्या, कानातील रिंगा, झुमके व वेल असा एकूण ४ लाख ३४ हजार रुपये किमतीचे साडे पंधरा तोळे सोन्याचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे करत आहेत.
.................