शिक्रापूर: पाबळ (ता. शिरूर )येथे पिंपळवाडी रस्त्यावर जमदाडे मळयात शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचवेळी दरोडेखोरांनी दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण आणि ३० हजार रुपयांची रोख रक्कम देखील लंपास केली आहे.
याबाबत शिक्रापूरपोलिस स्टेशन येथे तुळसाबाई जाधव (वय ७०रा. पाबळ) यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आसून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, पाबळ येथील जमदाडे मळ्यात तुळसाबाई जाधव व त्यांची मुलगी शकुंतला प्रकाश शिंदे दोघी घरात असताना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास घराबाहेर आवाज आल्याने त्यांना जाग आली. नातू आला असेल म्हणून त्याबाहेर आल्या. तेव्हा एकाने त्यांचा गळा दाबला. या झटापटीत व आवाजाने त्यांची मुलगी शकुंतला बाहेर आली. मुलीने प्रतिकार करताच दरोडेखोरांनी शकुंतला यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन खाली पडल्या. दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील गंठण, रक्कम आणि सुटकेसमधीत कपडे घेऊन पळ काढला.
त्यानंतर चोरट्यांनी काही अंतरावर असलेल्या खंडू निवृत्ती शेळके यांच्याही घराचे कडी, कोयंडे उचकटून कपाटात असलेले २५ हजार रुपये चोरट्यांनी लांबवले आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या शकुंतला यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले .
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे,पोलीस उपनिरीक्षक विक्रम साळुंके,विजय चौधरी,अमित देशमुख,यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान श्वानपथकाद्वारे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आधिक तपास शिक्रापूर पोलिस शिक्रापूर पोलिस करत आहेत .