शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे अज्ञात दरोडेखोरांच्या टोळक्याने लोखंडी रॉडच्या साह्याने घराचा दरवाजा तोडून घरातील लोकांना पिस्तुल, कोयता, लोखंडी गज, काठी आदी धारदार शस्रांनी मारहाण करून घरातील रोख २ लाख ७० हजार रुपये व साडेचार तोळे सोने असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दरोडेखोरांच्या हल्लात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे.
घटनास्थळी मिळलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि.६) पहाटे चारच्या सुमारास घडली. अज्ञात सहा दरोडेखोरांच्या टोळक्याने येथील आत्माराम निवृत्ती भाडळे यांच्या किराणा दुकानाच्या गेटचा तसेच घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात झोपेत असलेल्या भाडळे कुटुंबियांना पिस्तुल, कोयता, लोखंडी गज, काठी आदी धारदार शस्रांनी मारहाण करत महिलांच्या अंगावरील सोने ओरबाडून घेतले. तसेच पिस्तूलाचा धाक दाखवून घरातील २ लाख ७० हजार रुपयांची रोख रक्कम व सीसीटीव्ही फुटेजची मशीन घेऊन पोबारा केला.
या हल्ल्यात आत्माराम निवृत्ती भाडळे (वय ६३), मोहन आत्माराम भाडळे (वय ४०), जनार्दन आत्माराम भाडळे (वय ३८), सुरेखा मोहन भाडळे (वय ३८), श्रीहरी मोहन भाडळे (वय १५ सर्व रा. शेलपिंपळगाव-कोयाळी ता.खेड) हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार घेतले जात आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासनातील विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात सहा जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.