उधार न दिल्याने आंबेगाव पठार परिसरातील एका टपरी चालकाच्या टपरीमधील सामान रस्त्यावर फेकून देत गल्ल्यातील ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याबाबत सचिन जयेश पंड्या (रा. आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी अजिंक्य संतोष काळे (रा. गणेशनगर, आंबेगाव) याला अटक केली आहे. यावेळी काळे याने तेथे जमलेल्या लोकांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले.
तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली. लवित आप्पासाब कार्सर (वय ३०), विनयकुमार कृष्णा गौड (वय १८, दोघे रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गौड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबबात प्रदीप विजय वांजळे (वय ३७, रा. वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादी हे दुचाकीवर मित्रासोबत पाठीमागे बसून मोबाईलवर बोलत होते. यावेळी गौड याने त्यांच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसकावला. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपी अटक करून वारजे पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान या दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातही २० हजारांचा मोबाईल हिसकावल्याचा गुन्हा आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल या दोघांनी हिसकावला होता.
हडपसर येथील माळवाडी परिसरात महिलेला ढकलून देत जबरदस्तीने ४० हजार रुपयांची रिक्षा पळवून नेल्याची घटना मंगळवारी रात्री सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी ३३ वर्षांच्या महिलेने फिर्यादी दिली. त्यानुसार दादा शिंदे यांच्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी व आरोपी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी त्यांची रिक्षा माळवाडी येथील रस्त्यालगत लॉक करून पार्क केली होती. त्यावेळी आरोपीने त्यांना धक्का मारून रिक्षा पळवून नेली.
..........
जबरी चोऱ्या जुलै २०२१ अखेर ऑगस्ट २०२० अखेर
मोबाईल चोरी ६१ १८
सोनसाखळी चोरी ४३ १९
इतर जबरी चोरी ६९ ५३