दौंड : येथील नवीन तहसील कचेरीच्या परिसरात बेकायदेशीर वाळूउपसा करणाऱ्या चार ट्रकवर वाळूमाफियांनी दरोडा टाकून चार ट्रक पळवून नेले. या वेळी वाळूमाफियांना प्रतिकार करणारे कोतवाल लाला साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मध्यरात्री ३ च्या सुमारास घडल्याची माहिती ठाणे अंमलदार कचर शिंदे यांनी दिली. दरम्यान, नवीन तहसील कचेरीतून वाळू ट्रक पळविण्याची या आठवड्यातील दुसरी घटना आहे. दरम्यान, वाळूमाफियांच्या गुंडगीरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तहसीलदार उत्तम दिघे आणि त्यांच्या पथकाने वाळूमाफियांवर कारवाई करून बेकायदेशीर वाहतूक करणारे वाळू ट्रक जप्त केले आहेत. आज मध्यरात्रीच्या सुमारास वाळूच्या ट्रकचे मालक आणि चालक दौंड तहसील कचेरीच्या परिसरात आले. या वेळी कचेरीच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी कुलूप तोडून व प्रवेशद्वार उचकटून आत प्रवेश घेतला आणि चार वाळूचे ट्रक पळवून नेत असताना कोतवाल लाला साळवे यांना मारहाण करून वाळूचे ट्रक पळविले; मात्र मोठ्या शिताफीने दोन ट्रक मळद (ता. दौंड) येथील रेल्वे स्टेशनजवळ सापडले. दतात्रय चव्हाण, सतीश जमदाडे (दोघेही रा. तांबवे, माळशिरस, जि. सोलापूर), सुनील भोसले (रा. निवरे कोंढारपट्टा, माळशिरस, जि. सोलापूर), उल्हास वाघमोडे (रा. माळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यासह चार अज्ञात वाहनचालकावर वाळू ट्रकवर दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात महसूल खात्याचे लिपीक संजय गोयकर यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
दरोडा टाकून वाळूट्रक पळविले
By admin | Published: August 11, 2016 3:02 AM