मिलिंद कांबळे , पिंपरीउद्योगनगरीतील एमआयडीसी भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, महिला कामगारांची छेडछाड असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यात परिसरातील आरक्षित जागेत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. यामुळे औद्योगिक परिसर असुरक्षित झाला आहे. उद्योजक आणि कामगारांना असंख्य अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात ८ हजारपेक्षा अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. लाखो कामगार येथे काम करतात. बहुतेक कामगार सायकल, दुचाकी किंबा बसचा वापर करतात. कामावर ये-जा करताना कामगारांना मारहाण करून लुटण्याचे वारंवार घडतात. अंधाराचा आणि कमी वर्दळीचा भाग असल्याने चोरटे लगेच पसार होतात. तसेच उद्योजक, मालक व व्यवस्थापकांकडून जबरदस्ती आणि गुंडगिरीच्या बळावर खंडणी किंवा हप्ता वसूल केला जात आहे. सततच्या त्रास नको म्हणून ही खंडणी देऊन ते मोकळे होतात. या भागांतून रस्त्याने ये-जा करताना महिला कामगारांची छेडछाड टवाळ तरुण करत असतात. यामुळे महिला त्रस्त आहेत.लघु उद्योग आणि कंपनीतील साहित्याच्या चोरीचे प्रकार वारंवार घडतात. सुरक्षारक्षकाला मारहाण करून साहित्य आणि भंगार साहित्याची चोरी केली जाते. बंद पडलेल्या कंपन्यांतील यंत्रसामग्री, बांधकामातील दरवाजे, खिडक्या, तसेच पडीक साहित्य पळविलेजाते. त्याचबरोबर कामगारांनी रस्त्याकडेला लावलेली दुचाकी आणि सायकल लंपास होतात. यामध्ये पुरुषांबरोबरच महिला आणि लहान मुले गुंतले आहेत. चोरांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने चोरीच्या घटनांना लगाम बसलेला नाही.
कामगारांची लूट, उद्योजकांकडून खंडणी
By admin | Published: May 08, 2015 5:23 AM