पुणे : सनी इलेव्हन टी-२० क्रिकेट स्पर्धेत रॉक २७ क्रिकेट अकादमी आणि डेक्कन जिमखाना यांनी विजय मिळविले.
सिंहगड क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना सात बाद १६४ धावा केल्या. रॉक २७ क्रिकेट अकादमीने तीन बाद १६५ धावा करत विजय साकारला. सिंहगड क्लबकडून मयूर मैद (३८), अमर खेडेकर (५१), आशिष उदेग (४५) यांनी संघाला १६४ पर्यंत मजल मारून दिली. रॉक अकादमीकडून प्रेम चौधरी (५६), योगेश चव्हाण (४७), हितेश भामरे (३५) यांनी संघाचा डाव सावरताना विजय साकारला. अष्टपैलू कामगिरी करणारा योगेश चव्हाण सामनावीर ठरला.
दुसऱ्या लढतीत डेक्कन जिमखाना संघाने स्पायडर स्पोर्ट्स संघावर ६५ धावांनी विजय मिळवला. डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ बाद १५० धावा केल्या. स्पायडर स्पोर्ट्स संघाचा डाव १४.५ षटकांत ८५ धावांवर संपुष्टात आला. डेक्कम जिमखाना संघाकडून धीरज फटांगरे याने ३९ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांसह ७३ धावा केल्या. स्पायडर स्पोर्ट्सकडून अश्विनने तीन, रोहन पिसाळने दोन तर धीरज द्विवेदी, आनंद शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. स्पायडर संघाकडून आनंद शहा (२७), अश्विन शुक्ला (१७) यांनी झुंज दिली. डेक्कनकडून इशान कुलकर्णी, रोहन फंड आणि ऋषभ शर्मा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणारा रोहन फंड सामनावीर ठरला.
फोटो - योगेश चव्हाण, रोहन फंड