पुणे : शहरात म्यानमारमधील रोहिंग्यांना जन्माचे दाखले देण्यासंदर्भात जागृती दिसत आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यात केवळ ६० जणांना जन्माचे दाखले दिले होते, पण मालेगाव शहरात ४ हजार ३१८ जणांना दाखले देण्यात आले आहेत. अमरावतीत ४ हजार ५३७, मुंबईत ५८ दाखले देण्यात आले आहेत. राज्यातील अनेक शहरांत बांगलादेशी व रोहिंगे यांना दाखले देण्यात आले आहेत. अशा सगळ्यांना शोधून बांगलादेशात परत पाठविण्यात येणार आहे, असा दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.
सोमय्या यांनी गुरुवारी (दि. १६) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून जन्म-मृत्यू दाखल्यांची माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार मजबूत आहे. मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याने बोलण्याची संधी मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तर राजकीय नागरिकांना जेलमध्ये टाकण्यात येत होते. राज्याची कायदा आणि व्यवस्था एकदम मजबूत असून छोटीशी घटना घडली की लगेच लक्षात आणली जात आहे. त्याचा पाठपुरावा केला जात आहे. सलमान खान यांचा एक विषय वेगळा असून, वर्षानुवर्षे तो चाललेला आहे.
वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई झाली नाही याकडे लक्ष वेधल्यानंतर साेमय्या म्हणाले, वाल्मिकीविषयीचे गुन्हे तसेच विषय समोर येतील तेव्हा स्वतःहून ईडी दखल घेत असते. सध्या तपास सुरू आहे. ईडी ही त्यांच्या कार्यपद्धतीनुसार तपास करत असते.