पुणे : गेले काही दिवसांपासून शरद पवार यांचे नातू रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर खुद्द रोहित पवार यांनीही त्याला दुजोरा दिला होता. मात्र ते हडपसर आणि कर्जत-जामखेड अशा दोनही मतदारसंघांमध्ये कन्फ्युज असल्याची चर्चा होती. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला असून पक्षाकडे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कर्जत मतदारसंघाकरिताच्या उमेदवारीची मागणी केली आहे. पवार यांनी त्यांच्या फेसबुकवरून 'कर्जत-जामखेड का' अशी पोस्ट लिहून त्याबद्दलचे विचार मांडले आहेत.
पवार सुमारे दोन वर्षांपासूनअहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये पक्षाचे आणि वैयक्तीक उपक्रम राबवत आहेत. मात्र इथेच लढणार असल्याची माहिती त्यांनी कधीही स्पष्टपणे दिली नव्हती. दुसरीकडे पुण्यातील हडपसर मतदारसंघामध्येही त्यांनी चाचपणी केली होती. पण अखेर त्यांनी सर्व बाबतीत सुरक्षित असलेल्या कर्जतची निवड केली आहे. इथे त्यांचा सामना भाजपचे मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, 'कर्जत जामखेड का याच उत्तर आहे काम करण्याची प्रचंड मोठ्ठी संधी. कोणत्या मतदारसंघातून लढणं सोप्प आहे हा विचार न करता कोणत्या मतदारसंघात काम करण्याची संधी आहे हा विचार मी केला. आजवर व्यावसायिक क्षेत्र असो की सामाजिक, राजकिय क्षेत्र ज्या प्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे तसाच विश्वास ते टाकतील किंबहूना त्यांनीच उमेदवारीची मागणी केल्याने एक इच्छुक म्हणून मी राष्ट्रवादी पक्षाकडे पक्षाच्या नियमांप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते माझ्या आजवरच्या सामाजिक, राजकिय कामांचा विचार करुन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षामार्फत लढण्याची संधी देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो'. आता त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेते काय प्रतिसाद देतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.