पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देण्यात न आल्याने आमदार रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या नाराजीच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी महत्त्वाचं विधान केलं. 'रोहित पवारांकडे सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही. ते कधीही सत्तेत येऊ शकतात', असे आमदार शेळके म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके रोहित पवारांच्या नाराजीबद्दल बोलताना म्हणाले, "मागील दीड-दोन महिन्यांपासून आपण बघतोय की, रोहित पवार खूप नाराज आहेत. त्यांना पक्षात देखील डावललं जात आहे. त्याही पलिकडे जाऊन त्यांना सत्तेमध्ये यायचं आहे, अशी माहिती आम्हाला अनेक ठिकाणांहून मिळत आहे."
रोहित पवारांना सत्तेचा मोह आवरत नाहीये-शेळके
"त्यांना सत्तेचा मोह आता आवरत नाहीये. त्यांना सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसत आहे. रोहित पवारांचं कोणीही मनावर घेऊ नका. ते कधीही सत्तेमध्ये सामील होऊ शकतात", असे सूचक विधान आमदार सुनील शेळके यांनी केले.
"रोहित पवारांनी सरकारबद्दल जे दावे केले आहेत, त्या दाव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाहीये. त्यांच्या आरोपांना गांभीर्याने घेऊ नका. ते कधीही सत्तेत सामील होऊ शकतात", असा पुनरुच्चार आमदार शेळकेंनी केला.
पक्षाकडून कोणतीही जबाबदारी नाही, रोहित पवार म्हणाले...
काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक नेत्यांना पदे आणि जबाबदारी देण्यात आली.
याबद्दल रोहित पवारांनी म्हणालेले की, 'गेली सात वर्ष पक्षासाटी लढल्यानंतर कुठेतरी आम्ही कमी पडत असल्याचं काही नेत्यांना वाटत असल्याने त्यांनी निर्णय घेतला असेल. जबाबदारी दिली नाही म्हणून नाराज आहे, असा विषय नाहीये. पक्षाचा पाठिंबा कायम राहिला असून, विशेषतः शरद पवारांचा पाठिंबा माझ्यासारख्याला आणि इतरही कार्यकर्त्यांना राहिलेला आहे. तेवढाच पाठिंबा माझ्यासाठी खूप काही आहे."