Rohit Tilak: रोहित टिळक भाजपच्या वाटेवर? राजकीय वर्तुळात जाेरदार चर्चा
By राजू इनामदार | Published: July 29, 2022 12:56 PM2022-07-29T12:56:18+5:302022-07-29T12:57:59+5:30
पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा...
पुणे : टिळक स्मारक ट्रस्टकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पारितोषिक समारंभाचे यंदाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यावरून पुण्याच्या राजकीय वर्तुळात रोहित टिळक भाजपत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, गोव्यात अलीकडेच झालेल्या काँग्रेसच्या संकल्प कार्यशाळेत पक्षाच्या एक व्यक्ती १० वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर नको या धोरणानुसार त्यांचा प्रदेश कार्यकारिणी पदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळेच रोहित टिळक भाजपत जाण्याचे ठरवले असल्याचे गोव्यातील संकल्प शिबिरानंतर बोलले जात होते. टिळक यांच्या घरच्या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याने त्या चर्चेला पुष्टी मिळत आहे.
रोहित टिळक हे काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा उमेदवार होते. दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. विधानपरिषदेचे दिवंगत माजी सभापती व काँग्रेसचे नेते जयंतराव टिळक यांचे ते नातू आहेत. त्यांचे वडील दीपक टिळक हे देखील काँग्रेसचेच असून, टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे रोहित काँग्रेसचे काम करत आहेत. प्रदेश कार्यकारिणीवरही ते होते.
सलग दोन वेळा काँग्रेसमधून विधानसभेला पराभव झाला. सध्याच्या विधानसभेला ते उमेदवारही नव्हते. मात्र त्यांच्याच घरातील माजी महापौर मुक्ता टिळक या भाजपच्या उमेदवार होत्या व निवडूनही आल्या. त्या विद्यमान आमदार असतानाही रोहित भाजपत जाण्याच्या प्रयत्नात आहेत याबद्दलही पुण्याच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे शहरात मागील सलग १० वर्षे भाजपकडून राजकीय मात मिळत आहे. खासदार, सर्व आमदार व महापालिकेतही काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक आजी-माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली. त्यातील अनेक जण निवडूनही आले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही अनेक आजी-माजी आमदार भाजपत गेले व आमदारही झाले. त्यामुळेही रोहित टिळक या निर्णयाप्रत आल्याचे सांगितले जात आहे.
टिळक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १ ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात होणार आहे. डीआरडीओमधील महिला शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सन्माननीय उपस्थित असून, डॉ. दीपक टिळक यांघ्या हस्ते पुरस्कार वितरण हाेणार आहे.
याबाबत रोहित टिळक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ होता. मेसेज पाठविल्यानंतर त्याला रात्री उशिरापर्यंत प्रतिसाद मिळाला नाही