- विशाल दरगुडे दोन दिवसांपूर्वी खराडी आयटी पार्क रोडवर झेन्सार कंपनीसमोरील रोहित्राचा स्फोट होऊन दोन आयटी अभियंते भाजले गेले. त्यामध्ये तरुणी प्रियंका झगडे (वय २४, रा. सातारा) २० टक्के भाजली, तर मुलगा पंकज खुणे (वय २६, रा. वर्धा) ६० टक्के भाजला. त्यामुळे धोकादायक रोहित्रांचा प्रश्न समोर आला आहे. वडगावशेरी, खराडी, चंदननगर, विमाननगर परिसरातील सर्व रोहित्रासह डीपींची पाहणी केली असता येथील अनेक रोहित्रे व डीपी धोकादायक आहेत. अनेक रोहित्र व डीपींना आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा स्फोट झाल्यावर उपाययोजना केलेल्या नाहीत. रोहित्र व डीपीच्या बॉक्समध्ये झाडे वाढली असून झाडांच्या फांद्या रोहित्र व डीपीला लागून आहेत. त्यामुळे तिथेही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खराडीतील रोहित्र हे झेन्सार आयटी पार्कचे असून त्या ठिकाणी स्फोटोतील पीडित कामाला होते व ते दोघे पदपथावरून चालत असतानाच अचानक स्फोट झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. दोघांचा काहीच दोष नसताना आज ते तरुण व तरुणी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.वडगावशेरी, खराडी, चंदननगर परिसरातील सर्व रोहित्र व डीपींची पाहणी केली, यात असे दिसून आले, की अनेक रोहित्र व डीपीवर व त्यांच्या अवतीभवती मोठी झाडी वाढली आहेत. तसेच रोहित्र असेच उघड्यावर असून त्यांच्या आजूबाजूला जाळी किंवा काही सुरक्षेच्या दुष्टीने काळजी घेण्यात आलेली नाही. खराडी व वडगावशेरीतील अनेक डीपी व रोहित्र वाहतुकीस अडथळा ठरत असून त्याचप्रमाणे ते नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. तसेच अनेक रोहित्रे व डीपीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून तो अचानक पेटून स्फोट झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.रोहित्र व डीपीच्या मोठ्या हायटेन्शन केबल ह्या उघड्यावर टाकल्या आहेत. त्याही नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. गेल्या वर्षी टाटा गार्डन येथे नगररस्त्यावर मोठे महावितरणच्या केबलचे जाळे पसरलेले होते ते महावितरणच्या दुर्लक्षामुळे अचानक पेटले व त्यात पंचवीस लाखांच्या केबल दिवसा जळून खाक झाल्या. त्यात महावितरणचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याचे एका महावितरणच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. ही घटना घडल्यानंतर जवळपास दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर खराडी, चंदननगर, वडगावशेरीत वीजपुरवठा सुरळीत झाला. दोन दिवस परिसर अंधारात होते. हे काम करण्यासाठी मोठी यंत्रणा झटत होती. मात्र वेळीच सर्व केबल व्यवस्थित ठेवल्या असत्या तर ही वेळ आलीच नसती व तब्बल महावितरणचे तीस लाखांचे नुकसान झालेच नसते. हीच परिस्थिती सर्वत्र असून महावितरणच्या अधिकाºयांवर कुणाचाही अंकुश नसल्याचे दिसून आले आहे. एखादी घटना घडूनही महावितरणचे अधिकारी जर जागे होत नसतील तर ही खूप खेदाची गोष्ट आहे असेच म्हणावे लागेल. अजूनही वडगावशेरी व खराडीसह परिसरातील सर्व रोहित्र व डीपी धोकादायक असून महावितरणचा कारभार अतिशय निष्काळजी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.
खराडी परिसरात धोकादायक रोहित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:50 AM