रविकिरण सासवडेबारामती : संचारबंदीमुळे अनेक मजुरांचा रोजगार गेला आहे. अनेक मजूर शहरांमधून आपल्या गावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला. परंतू महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) स्थानिक व शहरातून गावाकडे स्थलांतर केलेल्या मजुरांना बारामती तालुक्यात हक्काचा रोजगार उपलब्ध होत आहे. शेकडो मजुरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. रोजगार हमी अंतर्गत बारामती तालुक्यात सुमारे 1 कोटी 10 लाखांची कामे सध्या सुरू आहेत. बारामती तालुक्यात पंचायत समिती स्तर आणि तहसील कार्यालय स्तर यामध्ये 71 कामांच्या माध्यमातून 552 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. यामाध्यमातून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मजुरांना मजुरी मिळवुन देउन याचे योग्य नियोजन झाल्यास ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलविण्याची ताकद या योजनेत आहे. हे बारामती तालुक्याच्या रोजगार हमी योजना विभागाने दाखवून दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक कामात विकासाची गंगा ठरु शकणार्या या योजनेकडे शहरी मजुरांचा देखील मोर्चा वळू लागला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक मजूराला किमान 238 रुपये मजुरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढ देखील होते.
बारामती तालुक्यातील रस्ता, घरकुल, सिंचन विहीर, कुक्कुटपालन या पंचायत स्तरावरील एकूण 41 लाख 1 हजार 800 रुपयांचे तर तहसील स्तरावरील रेशीम विकास तुती लागवड अंतर्गत तीन वर्ष मुदतीचे एकूण 69 लाख रुपयांचे काम सुरू आहे, अशी माहिती रोजगार हमी विभाग पंचायत समिती बारामतीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहन पवार यांनी दिली. संचारबंदीमुळे बांधकाम व्यवसाय, दळण-वळण, बाजार समिती लिलाव बंद असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांसमोर उपजीविकेचा प्रश्न मोठा आहे. परिणामी या आणीबाणीच्या स्थितीमध्ये अनेक मजूर कुटुंबाना रोजगार हमी योजनेने आधार दिला आहे.
या योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त सार्वजनिक लाभाची कामे व्हावी यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये मजुरांचा सहभाग वाढवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते, पाणी पुरवठा विहिरी व ओढा खोलीकरणाची कामे हाती घेण्यात येतील. - राहूल काळभोर गटविकास अधिकारी, बारामती पंचायत समिती
बारामती तालुक्यात सुरू असणारी कामे ( पंचायत समिती स्तर )
कामाचे स्वरूप कामाची संख्या मजूर संख्या कामाची किंमत रस्ता 1 230 14, 00, 000 घरकुल 40 134 8, 56, 800सिंचन विहीर 6 77 18, 00, 000 कुक्कुटपालन प्रकल्प 1 3 45, 000
तहसील स्तर
रेशीम विकास तुती लागवड 23 108 69, 00, 000 (तीन वर्ष मुदत)