बारामती (पुणे) :बारामती शहर अवघ्या राज्यासाठी विकासाचे रोल माॅडेल आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे. दर्जेदार कामांचे येथील विकासकामे सर्वोत्तम उदाहरण आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बारामती येथे पोलिस उपमुख्यालय, बसस्थानक, शहर पोलिस ठाणे, पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन, तसेच नमो महारोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, एखादा प्रकल्प हाती घेतल्यावर ते काम वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी ‘अजितदादां’चा कटाक्ष असतो. बारामती शहरातील बसस्थानकदेखील माॅडेल बसस्थानक आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना लाभ मिळाला. त्याचप्रमाणे रोजगार देण्यासाठी एका छताखाली लाेकांना बोलावून देणारे हे पहिले सरकार आहे. या निमित्ताने रोजगाराची मोठी संधी आहे. आजच्या महारोजगार मेळाव्याच्या आयोजनाने आजपर्यंतच्या रोजगार मेळाव्याचे रेकाॅर्ड मोडीत काढले आहे. त्यासाठी ‘अजितदादां’चे मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील अजित पवार यांचे काैतुक केले. पंतप्रधानांचे दहा लाख लोकांना रोजगार देण्याचे ‘टार्गेट’ आहे. आमचे सरकारदेखील रोजगारासाठी काम करीत आहे. बारामतीत आजचा कार्यक्रम होत आहे. ‘अजितदादां’नी बारामती एक नंबरची करणार, असे सांगितले आहे. राज्याच्या तिजोेरीच्या चाव्या ‘अजितदादां’च्या हातात आहेत. बारामतीचा विकास करताना हात आखडता घेणार नाही, हा शब्द देतो, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अजित पवार म्हणाले, आजच्या काळात सर्वांना नोकऱ्या मिळणे कठीण आहे. मात्र, महारोजगार मेळाव्यामुळे देशात मोठा रोजगार उपलब्ध आहे. मात्र, संधीचे सोने करता येणे आवश्यक आहे. करायचं तर एक नंबर करायचं. नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यात विकासकामे करताना आपण ती मनापासून करतो. एक दिवस असा आणेन, बारामती महाराष्ट्रात विकासाबाबत क्रमांक १ चा तालुका करेन, त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साथ देतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्य शासनाने ग्रामपंचायत स्तरावर २००० स्कील सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बारामतीत रोजगार मिळेपर्यंत प्रशिक्षण सुविधा निर्माण करणार असल्याचे लोढा म्हणाले. यावेळी रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या आयुक्त निधी चाैधरी यांनी प्रास्ताविक केले.
...त्यामुळेच आमची साथ सरकारला : शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी यांना रोजगार मिळाला. जगात सध्या सर्वांचे ‘एआय’ तंत्रज्ञानावर लक्ष आहे. या ठिकाणी आपण त्यासंबंधी पहिले महाविद्यालय सुरू केले आहे. पुढील वर्षी त्याची वास्तू तयार होईल. या क्षेत्रात राज्य सरकार काम करीत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण असते. मात्र, जिथं काहीतरी नवीन करीत आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर सहकार्य केले पाहिजे. ही भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो, मुलांच्या हातांना काम देण्यासाठी आम्हा लोकांची साथ राहील, असे शरद पवार म्हणाले.
आज बारामतीत ‘पवारसाहेब’ आणि ‘अजितदादा’देखील व्यासपीठावर आहेत. आमचं सरकार लोकाभिमुुख, सर्वसामान्यांचं आहे. सरकार राजकारणविरहित काम करीत आहे. त्याची प्रचिती आपणास येथे आली आहे. विकासामध्ये राजकारण कोणतेही आणू इच्छीत नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री