पुणो : शहरातील मेट्रो, घनकचरा व्यवस्थापन, रेल्वे उड्डाणपूल, नदी सुधार योजना हे केंद्र शासनाशी संबंधित प्रकल्प प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करण्यावर असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. केंद्र आणि राज्यशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी आज पालिकेस भेट दिली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी, सभागृह नेते सुभाष जगताप या वेळी उपस्थित होते.
घनकच:याचा प्रश्न सोडविण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाइन आहे. यासाठी पर्याय शोधण्यात येत आहेत. प्लॅस्टिकबाबत योग्य निर्णय घेण्याची विनंती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना करणार असल्याचे ते म्हणाले, तसेच शहरात व पिंपरीत संरक्षण विभागाच्या जागा असून, त्याठिकाणी वाहतुकीच्या समस्या आहेत. त्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर, तसेच कात्रज-देहूरोड मार्गाच्या समस्येसाठी नितीन गडकरी यांना पत्र पाठविणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
हेल्मेटसक्तीचा प्रश्न आमदारांनी सोडवावा
शहरात भाजपाचे खासदार आणि आठ आमदार आहे. हेल्मेटसक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. गृहमंत्री भाजपाचाच आहे. येथूनच बसून गृहमंत्र्यांना फोन केला, तरी काम होण्यासारखे आहे, त्यामुळे या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करण्याची गरज नाही, तर शहरातील आमदारांनीच तो सोडवावा, असा टोलाही पवार यांनी या वेळी लगावला.
चांगला उपक्रम म्हणून स्वच्छता मोहिमेस पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘भारत स्वच्छता अभियाना’मध्ये सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी जवळीक साधली का, याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, कुठल्याही चांगल्या उपक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राहील. स्वच्छता अभियान असो अथवा गाव दत्तक योजना असो, जनतेच्या संदर्भातील प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सकारात्मकच, तर या मोहिमेस काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही गाव दत्तक घेऊन पाठिंबा दिला असल्याचे सांगितले.