लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या पुढे जाऊन काम करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात माध्यमिक शाळेत सर्वात जास्त महिला शिक्षिका आहेत. संस्कार केंद्र असणाऱ्या या विद्यालयांमध्येही महिलांचे योगदान अधिक दिसते. त्यामुळे पुण्यातील शिक्षणक्षेत्रातही महिलांचा वाटा अमूल्य असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.
डेक्कन येथील लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या ११ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व पुणे कॉस्मोपॉलिटन लेडिज सर्कल ८१ (पीसईलसी) यांनी घेतले. यावेळी त्यांनी प्रशालेला ५७ हजार ६५० रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी संस्थेच्या नेहा सेठिया, रीटा गुप्ता, अनुपमा जैन, रुचा जैन, प्रशालेच्या प्राचार्य मेधा सिन्नरकर आदी उपस्थित होते.
नेहा सेठिया म्हणाल्या की, यंदाच्या वर्षी ममता फाउंडेशन या संस्थेला दत्तक घेतले असून संस्थेतील एड्सग्रस्त मुलांना धान्य, फळे, भाज्या, औषधे अशा गरजेच्या वस्तू देत आहोत. पीसीएलसी ८१ लेडीज सर्कल इंडियाचे अनेक भाग असून महिला, मुले व समाजातील गरजूंना मदत करणारी संस्था आहे. सुमेधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मेधा सिन्नरकर यांनी प्रास्ताविक केले.