लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रावर अतिवृष्टी, पुराचे संकट ओढवले. दरडी कोसळल्या. निष्पाप लोकांना जीव गमवावे लागले. संकट मग ते अतिवृष्टी, कोरोना किंवा देशाच्या सीमेवर आलेले संकट असो ते दूर करण्याचे काम हे त्या त्या क्षेत्रातील सैनिक करीत असतात. कोणतेही काम हे प्रसिद्धीसाठी किंवा अपेक्षा न ठेवता करीत राहायचे, अशा भूमिकांमधूनच समाजासमोर आदर्श निर्माण होतो, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
सरहद्द संस्थेकडून कारगिल प्रदेशाशी जोडल्या गेलेल्या मुला-मुलींना पुण्यात आणून शिक्षण देण्याचे काम संवेदनशीलपणे केले जात आहे. देशासाठी, देशप्रेमासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, वंचितांसाठी काम करण्याची ही सरहदची भूमिका महत्वाची आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले.
सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्या वतीने कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने कारगिल लेह येथे आयोजिलेल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या ४०० व्या प्रकाशपर्वानिमित्त शहिदांना अभिवादन तसेच राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कारांच्या प्रदान समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारगिलचे एक्झिक्युटिव्ह काँन्सिलर आगा सैय्यद अब्बास रिझवी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तेग बहादूर प्रकाशपर्व समितीचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आयोजक संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रँड अँम्बेसिडर म्हणून घोषित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आगा सैय्यद अब्बास रिझवी, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, डॉ. अपश्चिम बरंठ, डॉ. विजय कळमकर, डॉ. अनिल पाचणेकर, राकेश भान, वीरपत्नी उमा कुणाल गोसावी, डॉ. सतीश देसाई यांना वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बावीस वर्षांपूर्वी कारगिलचे युध्द झाले. आपल्याला विजय मिळाला. म्हणून आजचा कार्यक्रम आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हल्ली पुरस्कार खूप देण्यात येतात, परंतु पुरस्काराचे महत्व पाहिले तर आज दिलेले पुरस्कार हे विशेष आहेत. सरहद संस्थेच्या कार्याला नेहमीच सहकार्य राहील, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
रिझवी म्हणाले, पुण्यात कारगिल विजयाबददल आज इतके भरभरून बोलले जात आहे, की जणू कारगिलमध्येच असल्यासारखे वाटत आहे. यापुढील काळात पुणे-कारगिल मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महाराष्ट्रातील लोकांनी कारगिलला भेट द्यावी, असे आवाहन करतो.
प्रास्ताविकात संजय नहार यांनी जम्मू काश्मीर आणि लेह लडाखमधील शंभर मुलींना दत्तक घेणार आहे. सरकारकडून कोणतीही अपेक्षा नाही. मिशनरी चळवळ म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. नीरजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले आणि संजीव शहा यांनी आभार मानले.
-------------------
प्रत्येक भारतीयाला कारगिल विजय दिवसाचा अभिमान वाटला पाहिजे. ‘लोकमत’ने कारगिल युद्धानंतर महाराष्ट्रातील सैनिकांच्या मुलांसाठी चार वसतीगृह निर्माण केली. ‘लोकमत’ने निधी जमा केला. यात समाजासह ‘लोकमत’ समूहाचेही योगदान होते. जे जे शहीद झाले, त्यांच्या घरी जाऊन या निधीमधील काही रक्कम दिली. याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे. त्यामुळे ‘लोकमत’चे कारगिलशी नातं राहिलं आहे. हा पुरस्कार केवळ ‘लोकमत’चा नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमे आणि प्रतिनिधींचा पुरस्कार असल्याचे मानतो.
- विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत
----------------------------