पिंपरी : पवना धरण परिसरातील अनधिकृत टेन्टचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय, पोलिस तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पाठबळावर गैरप्रकार सुरू असतील तर अशा कर्मचाऱ्यांनाही दणका देण्याचा इशारा पोलिस व पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला.
मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या काठावर असलेल्या अनधिकृत टेन्टचा कॅम्प व्यवसाय आणि त्यातील गैरप्रकारांना ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे तडाखा दिला होता. येथे सुमारे १५० ते २०० टेन्ट असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, हे टेन्ट अधिकृत आहेत की अनधिकृत हेच प्रशासनाला माहीत नाही. शिवाय येथे रात्री चालणाऱ्या पार्ट्यांमध्ये दारू, हुक्का आणि अमली पदार्थांचा वापर होत असून त्याकडे पोलिस प्रशासन काणाडोळा करत असल्याचे गंभीर आरोप होत आहेत. अनधिकृत टेन्टवर कारवाईची जबाबदारी फक्त पोलिस प्रशासनाची नाही तर ती धरण अधिकाऱ्यांचीही आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि धरण अधिकाऱ्यांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या टेन्टचालकांना पाठीशी घालणाऱ्या सरकारी पाठीराख्यांचीही उचलबांगडी होणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
कारवाई करताच टेन्टचालक होतात आक्रमक
अनधिकृत टेन्ट उभारण्यात स्थानिक आघाडीवर आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस अथवा पाटबंधारे विभागाचे कर्मचारी गेले तर आमची जागा धरणात गेली, आम्ही उपजीविका चालवण्यासाठी कृषी पर्यटन करत आहोत, आमचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही उपजीविका कशी करायची, असे सांगत टेन्टचालक आक्रमक होतात. त्यांना स्थानिक राजकीय मंडळींचे पाठबळ असल्याने त्यांचे मनोबल उंचावत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
तो पोलिस कर्मचारी ठाण मांडून
पोलिस दलातील एक कर्मचारी गेली पाच वर्षे या परिसरातच ठाण मांडून आहे. तोच या टेन्ट चालकांना आतील खबर देतो. तोच विशेष ‘वसुली’ करत असल्याची चर्चा आहे. त्याची बदली करण्याची मागणी काही जणांनी केली होती. राजकीय नेतेही उघडपणे पोलिसांना पैसे देण्याबाबत सांगत असल्याची चर्चा आहे. हात ओले झाल्यानेच बेकायदेशीर टेन्टना अभय दिले जात आहे.
लाखोंचा महसूल बुडीत
पवना धरण परिसरातील टेन्ट चालक ग्राहकांकडून स्वत:च्या किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या खात्यावर पैसे घेतात. त्यामुळे ते पैसे जीएसटी किंवा इतर करात दाखविले जात नाहीत. यातून महिन्याला कोट्यवधींची उलाढाल या परिसरात होते. त्यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
अधिकारी म्हणतात....
पवना नदीपात्रात अनधिकृत तंबू उभारून व्यवसाय थाटला आहे. त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. धरणात बोटिंग व कयाकिंग करणाऱ्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण
पवना धरण परिसरातील अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिस ठाण्यास सूचना दिल्या आहेत. कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
- सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पुणे ग्रामीण
पवना धरण परिसर आमच्या हद्दीत येत नाही. मळवंडी परिसरात काही तंबू असतील तर त्यांची माहिती घेतो. ‘स्पॉट व्हिजिट’ही करणार आहे. तेथे टेन्ट असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अजित दिवटे, तहसीलदार, मावळ
पवना परिसरात टेन्ट आहेत. त्यांना महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी देण्यात आली आहे. या परिसरात वीजचोरी होऊ नये, यासाठी महावितरणचे पथक फेऱ्या मारत असते. त्यातून मागील वर्षी २५ जणांची वीजचोरी उघड करून सुमारे तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता.
- निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण