पिंपरी : पिंपरी : परमिट रूम व परवानाकक्षाबाहेर मद्यविक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात रुफटाॅपवर मद्यविक्री करणाऱ्या हाॅटेल, परमिट रूम यांच्यावर कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड व पुणे शहर तसेच जिल्ह्यात २८ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रुफटाॅपवर मद्यविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रुफटाॅपवर मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई येथील आयुक्त कांतीलाल उमाप व अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक सुनील चव्हाण यांनी दिले. त्यानुसार ‘राज्य उत्पादन’चे पुणे विभागाचे उपायुक्त ए. बी. चासकर आणि अधीक्षक चरणजितसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १२ विभाग, दोन भरारी पथके व एक विशेष पथक यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली.
मद्यविक्रीचा परवाना असलेल्या जागेव्यतिरिक्त रुफटाॅपवर मद्यविक्री होत असल्याचे या कारवाईत दिसून आले. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हाॅटेल, परमिट रूमच्या रुफटाॅपवर मद्यविक्री होत असल्याचेही काही प्रकार समोर आले. अशा २८ ठिकाणी कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
आयटीपार्कमध्येही बेकायदा मद्यविक्री
पुणे येथे कल्याणीनगर येथील आयटी पार्कमध्ये रुफटाॅपवर मद्यविक्री होत असल्याचे समोर आले. तसेच बालेवाडी, कोरेगाव पार्क अशा उच्चभ्रू भागातदेखील असा प्रकार समोर आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून दणका दिला.
पोलिसांनी दिली होती दुकानांची यादी
मद्यविक्रीच्या नियम व अटींचे पालन न करता काही दुकानदारांकडून मद्यविक्री होत असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अशा मद्यविक्रीच्या दुकानांची यादी पोलिसांनी तयार करून राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आली होती. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानदारांबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
यापुढेसुद्धा कारवाई सुरू राहणार आहे. मद्यविक्रीच्या नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल. मद्यविक्रीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करावी किंवा माहिती द्यावी.
- चरणजितसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे