शेलपिंपळगाव/ आळंदी : चड्डी व बनियान घातलेल्या सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने मरकळ (ता. खेड) येथील बाजारेवस्तीवर आज (गुरुवार) मध्यरात्रीच्या सुमारास धुडगूस घातला. दहशतीचा वापर करून सुमारे सत्तर हजार रुपयांचा ऐवज लुटला. या टोळीला प्रतिकार करणाऱ्या बाप-लेकाला त्यांनी बेदम मारहाण केली असून, त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, दरोडेखोर चड्डी-बनियान गॅँगचे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न या टोळीने केला असल्याचा दावा आळंदी पोलिसांनी केला आहे. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना आळंदी-मरकळ रस्त्यावरील बाजारे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याला लागून असलेल्या येथील वस्तीवरील शांताराम लोखंडे यांच्या घरावर दगडफेक करत प्रथम हल्ला केला. घराबाहेरील अंगणात झोपलेल्या शांताराम लोखंडे व त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्याला त्यांनी काठ्यांनी जबर मारहाण करीत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळविला. बाहेरील आरडाओरड्याने घरातील नवनाथ शांताराम लोखंडे (वय ३०) यांनी या टोळक्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही काठ्यांनी जबर मारहाण करून घरातील कपाटामधील रोख नऊ हजार रुपये, मंगळसूत्र, पायातील पैंजण, राणी हार अशा मौल्यवान वस्तू, असा अंदाजे सत्तर हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या बाप-लेकांना प्राथमिक उपचारासाठी तत्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मारहाणीत नवनाथ शांताराम लोखंडे यांना दुखापत झाली असून, त्यांच्या वडिलांनाही किरकोळ जखम झाली आहे. या घटनेची माहिती आळंदी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजयकुमार पाटील आदींनी भेट दिली. श्वानपथक व अंगुली मुद्रातज्ज्ञ पथकाद्वारे घटनेची पाहणी करण्यात आली आहे. अज्ञात सात ते आठ जणांच्या टोळक्यावर आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांची विशेष चार पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेची फिर्याद दीपाली लोखंडे यांनी आळंदी पोलिसांना दिली. (वार्ताहर)
मरकळला दरोडेखोरांचा धुडगूस
By admin | Published: October 16, 2015 1:19 AM