पुणे : एकत्र राहत असलेल्या कामगाराने सकाळची राहिलेली भांडी घासण्यास सांगितल्याच्या कारणावरुन भाजी चिरायच्या चाकूने भोसकून आपल्या सहकाऱ्याचा खून केला. अमर बसंत मोहापात्रा (वय २८, रा. प्रथम ब्लीस सोसायटी, बाणेर, मुळ ओडिसा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी अनिलकुमार सरतकुमार दास (वय २१) याला अटक केली आहे.
याप्रकरणी बिरजु भुवनेश्वर साहू (वय ४०, रा. प्रथम ब्लीस सोसायटी,बाणेर) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेरमधील प्रथम ब्लीस सोसायटीत शुक्रवारी रात्री ९.४० वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओडिशा येथील हे तिघे कामगार पुण्यातील एका सलूनमध्ये काम करतात. तिघेही बाणेरमधील प्रथम ब्लीस सोसायटीत एकत्र राहत होते. घरीच ते स्वयंपाक करत असत. कामावरुन रात्री घरी आल्यावर अमर याने सकाळची राहिलेली भांडी घासण्यास अनिलकुमार याला सांगितले होते.
त्यावरुन "तू मुझे बरतन धोने के लिए बोलता है क्या, तुझे आज खल्लास करता हूॅ," असे म्हणून त्याने स्वयंपाक घरातील भाजी चिरण्याचा चाकू घेऊन अमर याच्या छातीत खुपसला. वर्मी वार लागल्याने त्यात अमर मोहापात्रा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अनिलकुमार दास याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे अधिक तपास करीत आहेत.