पुणे : सलग ४ महिने बंद असलेले एसटीचे चाक पुन्हा फिरायला लागावे यासाठी रिक्षा पंचायतीने पुढाकार घेतला आहे. पंचायतीच्या वतीने एसटी वाचवा, एसटी वाढवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनी (दि. १० मार्च) मुंबईत मंत्रालयासमोर समितीच्या वतीने शालेय तसेच महाविद्यालयीन मुलींना बरोबर घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पंचायत व एसटीविषयी जि्व्हाळा असलेले ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते हेही आंदोलनात सहभागी होणार आहेत.
समितीचे पदाधिकारी नितीन पवार ,सुभाष लोमटे ,प्रभाकर नारकर, धनाजी गुरव यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले, बहूजन समाजाच्या शैक्षणिक व सर्वच विकासात एसटी महामंडळाच्या गाड्यांचा फार मोठा वाटा आहे. एसटी बंदचा सर्वाधिक फटका याच समाजाला बसला आहे. आता शाळा सुरू झाल्या महाविद्यालये सुरू झाली, मात्र तिथे पोहचण्यासाठी गावांमधून एसटी नसल्याने शिकणाऱ्या मुलींची अडचण होत आहे.याशिवाय शेतमाल विक्री व अन्य कामांसाठी शहरांमध्ये रोज जावे लागणाऱ्या कुटुंबानाही जादा खर्च करून खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते आहे.
समिती फकत मागणी करून थांबणार नाही तर राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, कलाकार, लेखक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, निवृत्त अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य अशा सर्व स्तरातील मान्यवरांच्या स्वाक्षऱ्यांचे एक निवेदन सरकारला पाठवण्यात येणार आहे अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. एसटीच्या खासगीकरणाही समितीचा विरोध आहे. सरकार व कामगार यांनी चर्चा करून प्रश्न सोडवावेत व तातडीने एसटी सुरू करावी अशी समितीची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.