नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झाला आहे. दरम्यान, दि. २५ एप्रिलपासून पाण्याचे हे आवर्तन सोडण्यात येईल आणि हे आवर्तन २७ दिवस चालणार आहे. नागरिकांनी या पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी केले आहे.कुकडी प्रकल्पातून केवळ पिण्यासाठीच पाणी सोडण्यात येईल. डिंभा डावा कालव्याद्वारे ५७५ क्युसेक्सने येडगाव धरणात पाणी सोडण्यात येईल.पिंपळगाव जोगा कालव्यातून ५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी डिंगोरे,ओतूर, आळेफाटा, राजुरी, आणे, बेल्हा, आळकुटीमार्गे देवीभोयरे, वडझिरे तलावात पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत निर्माण केला जाईल. त्यानुसार नागरिकांनी केवळ पिण्यासाठीच या पाण्याचा वापर करावा.मागील वर्षी कुकडी प्रकल्पात २.१६५ टीएमसी म्हणजेच ७.०९ टक्के पाणीसाठा होता, तर या वर्षी पाणीसाठ्यात वाढ होऊन एकूण ४.४१० टीएमसी म्हणजेच १४.४४ टक्के पाणीसाठा होता. त्यानुसार या वर्षी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. (वार्ताहर)
कुकडीतून मंगळवारपासून पिण्यासाठी आवर्तन
By admin | Published: April 24, 2017 4:38 AM