युगंधर ताजणे - पुणे : राज्यातील काही कारागृहांमधील कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने भीतीचे वातावरण आहे. मोठ्या संख्येने कारागृहात असणा-या कैद्यांच्या आरोग्याची काळजी कारागृह प्रशासनाकडून घेतली जात आहे. यात पुण्यातील येरवडा कारागृहाने राबवलेल्या 21 दिवसांच्या रोटेशन पँटर्नला यश आले असून अद्याप एकही कोरोना रुग्ण न सापडल्याने अधिकारी, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. आरोग्याच्या दृष्टीने घेतलेली काळजी, नियमांचे केलेले पालन महत्वाचे ठरले आहे. एप्रिलपर्यंत राज्यातील कुठल्याही कारागृहात कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण नव्हता. मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील एका कारागृहात कोरोनाचा संशयित रुग्ण सापडल्याची घटना घडली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कारागृहात देखील कोरोनाचे रुग्ण सापडल्याची चर्चा होती. येरवडा कारागृहातील रोटेशन पँटर्न याविषयी अधिक माहिती देताना येरवडा कारागृहाचे उपमहानिरीक्षक (पश्चिम विभाग) योगेश देसाई म्हणाले, 21 दिवस अधिकारी कर्मचा-यांचे कारागृहातील रोटेशन ही पध्दत अवलंबण्यात आली आहे. नियमितपणे अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी केली जाते. पुढील 21 दिवस स्वत:ला कोरोनटाईन करुन घेणे, कुणाच्या संपर्कात न येणे, स्वतच्या आरोग्यची काळजी घेणे हे नियम कटाक्षाने पाळले जात आहे. ज्यावेळी हे कर्मचारी व अधिकारी कारागृहात प्रवेश करतात तेव्हा त्यांची स्वँब टेस्ट देखील केली जाते. कर्मचा-यांना त्यांच्या प्रवासाची ‘हिस्ट्री’ विचारली जाते. यासर्व बाबीं लक्षात घेऊन पुढील रोटेशनचे वेळापत्रक ठरवले जाते. कटेंमेंट भागातून येणा-या कर्मचा-यांची संख्या फारशी नाही. कारागृहात गेल्यानंतर एकमेकांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवण्याच्या सुचना कर्मचा-यांना देण्यात आल्या आहेत. मास्क, ग्ल्वोज, सँनिटायझरचा वापर करण्यास सांगितले आहे. दुस-या शिफ्टमध्ये काम करणारे जे अधिकारी, कर्मचारी आहेत त्यांना घरी थांबण्याचे आदेश आहेत. त्यांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तु पोहचवण्याची काळजी घेण्यात आली आहे. माहिती घेण्यासाठी ‘रो कॉल’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी तो कॉल घेण्यात येतो. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना समजते. अत्यावश्यक सुचना असल्यास त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सदारे संवाद साधला जातो. जे कर्मचारी घरगुती कारणासाठी बाहेरगावी गेले आहेत, सुट्टीवर आहेत त्यांचा पुन्हा त्या रोटेशन मध्ये समावेश केला जात नाही. हा पॅटर्न यशस्वी झाला आहे.
…............
21 दिवस कारागृह अधिकारी व कर्मचारी कारागृहात जातात. त्यानंतर पुन्हा 21 दिवसांनी दुसरे अधिकारी व कर्मचारी आत जातात. प्रत्येक वेळी आरोग्याची काळजी घेतली जाते. स्क्रिनिंग होते. एका शिफ्ट मध्ये 110 जणांचा समावेश आहे. 77 दिवसांपासून ही पध्दत अवलंबण्यात आली आहे. आतापर्यंत तीन रोटेशन झाले आहेत. पहिली दोन रोटेशन 28 दिवसांची झाली आहेत. यासगळयात कैद्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहात सध्या पाच हजाराहून अधिक कैदी आहेत. त्यात मृत्युदंड शिक्षाबंदी, बॉम्ब स्फोट खटल्यातील बंदी, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक गुंड टोळीचे म्होरके, विरोधी टोळीचे बंदी बंदिस्त आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षापर्यंत शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत पँरोल आणि जामिनावर हजाराहून अधिक कैद्यांना सोडण्यात आले आहे.