लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी, नांगरणी, फणनी यासाठी जास्त खर्च येत असल्यामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगावच्या हृषीकेश सचिन लडकत याने खाऊचे पैसे वापरून मनुष्यबळावर चालणारे रोटावेटर स्प्रेइंग मशिन तयार केले आहे.
हृषीकेशला लहानपणापासूनच उपकरणे उघडणे आणि जोडण्याची आवड आहे. वडील सचिन लडकत यांचे प्रोत्साहन सतत त्याच्या पाठीशी आहे. पुढे त्याला संशोधन क्षेत्रातच घालण्याची त्याच्या वडिलांची इच्छा आहे. हे उपकरण मनुष्यबळावर चालत असल्यामुळे त्याला इंधन लागत नाही. फवारणीसाठी बॅटरी असल्यामुळे खूप कमी पैशात चार्जिंग होते. यामुळे ते परवडण्यासारखे आहे. हे उपकरण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सोपे आहे. छोट्या जागेतही याचा वापर चांगल्या पद्धतीने करता येतो. यासाठी हृषीकेशने लोखंडाचा वेल्डिंग करून घेतलेला सापळा, एक बॅटरी, मोटार, स्प्रिंकलर, एक डबा, सायकल चैन व दोन सायकलची चाके एवढे साहित्य लागले आहे.
हृषीकेशचे मार्गदर्शक व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल म्हणाले की, ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पना आहेत पण त्या अमलात आणण्यासाठी आर्थिक अडचण येत आहे. केंद्र सरकारने आणलेली इंस्पायर अॅवाॅर्ड योजना यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे. कुटुंब व शिक्षक अशा धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींकडून अशा विद्यार्थ्यांना पाठबळ मिळण्याची गरज आहे.
या उपकरणामुळे नांगरणी, फनणी करता येते तसेच दोन्ही बाजूला असणाऱ्या झाडांना औषध फवारणी करता येते.
हृषीकेशला विज्ञान शिक्षिका तृप्ती डेरे, विज्ञान शिक्षक रतिलाल बाबेल, मुख्याध्यापक रवींद्र वाघोले यांचे मार्गदर्शन मिळाले.
फोटो मजकूर - गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगावच्या हृषीकेश सचिन लडकत याने खाऊचे पैसे वापरून मनुष्यबळावर चालणारे ‘रोटावेटर स्प्रेइंग मशिन’ तयार केले आहे.