श्रीकिशन काळे
पुणे - शहरांमधल्या नद्या, तलाव यांसारख्या जलस्रोतांवर अनेक कारणांमुळे घातक परिणाम होतो आहे. मुळा-राम नदी संगमाच्या ठिकाणी, गोड्या पाण्यात आढळणाऱ्या पेटेंटीलस टेनुइस (Pettancylus tenuis) या शंखवर्गीय प्राण्याची पुणे विभागातील पहिली नोंद झाली आहे. तर विठ्ठ्लवाडीला, गोड्या पाण्यात आढळणाऱ्या लिकेन (Lecane) या प्रजातीतील रोटीफेरा (पाण्यातील अनेक पाय असलेला जीव) प्राण्याची महाराष्ट्रातील पहिली नोंद झाली आहे. एक किलोमीटरच्या अंतरावरच ६० ते ७० जीवांचे अस्तित्व आढळून आले. हे अतिशय महत्त्वपूर्ण जैविक ठेवा आहे.
हे संशोधन डॉ. चित्रा वंजारे, डॉ. समीर पाध्ये, डॉ. अविनाश वंजारे, डॉ. युगंधर शिंदे यांनी केले असून, जीवितनदीच्या नदीकाठी दत्तक योजनेच्या समन्वयक शुभा कुलकर्णी, शैलजा देशपांडे, संशाेधनासाठी नियोजन करणाऱ्या कीर्ती अमृतकर-वाणी, अदिती देवधर यांनी त्यांना सहकार्य केले.
मुळा आणि मुठा नद्यांवर, या गोड्या पाण्यात आढळणाऱ्या अपृष्ठवंशीय प्राण्यांचा, ३ महिने (नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१) अभ्यास करण्यात आला. या कामात बॉयलॉजिया लाईफ सायन्सेस या संस्थेतील सर्व संशोधकांचा प्रमुख सहभाग आहे. विठ्ठलवाडी येथे मुठा नदीवर आणि बाणेर येथे मुळा-राम नदी संगमावर नदीकाठावरील पाणथळ जागा, छोटे रांजणखळगे अशा ठिकाणी हा अभ्यास झाला.
पाण्याच्या गुणवत्तेचे निदर्शक (Bio-indicator) म्हणून हे छोटे-छोटे जीव महत्त्वपूर्ण आहेत. पोरीफेरा, रोटीफेरा, क्रस्टेशिआ, मोलुस्का (शंख/शिंपले), कोलीओप्टेरा, हेमीप्टेरा, ओडोनॅटा (चतुर, टाचणी) या प्राणी गटांमधील जीवांवर, पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, पाण्याचे तापमान, पाण्यातील फॉस्फेट, नायट्रेट यांसारखे प्रदूषणकारक घटक यामुळे परिणाम होतो.
---------------------
खूप वेळा जलस्रोतांमधला गाळ काढणे, त्याच्या काठावर विकासप्रकल्प करणे या गोष्टी त्यातल्या जैवविविधतेचा अभ्यास न करता केल्या जातात. छोट्या प्राण्यांचे गट, त्यांचा अधिवासाचा ऱ्हास होतो. परिसंस्थेच्या मुळाशी असलेले प्राणीच नष्ट झाले तर वरचा सगळा मनोरा (अन्नजाळे) कोसळतो. एकदा का हे प्राणी एखाद्या जलाशयातून हद्दपार झाले तर त्यांना तिथे पुन्हा प्रस्थापित करणे हे फार अवघड होऊन बसते.
- र्कीर्ती अमृतकर-वाणी, संस्थापक, जीवितनदी
-------------------------
या अभ्यासात आढळलेल्या काही महत्त्वपूर्ण नोंदी –
· विठ्ठलवाडी येथे मुठा नदीच्या १ किमीच्या भागात ७० अपृष्ठवंशीय प्राण्यांचा प्रजातींची नोंद
· मुळा-राम नदी संगमावर १ किमीच्या भागात ६४ अपृष्ठवंशीय प्राण्यांचा प्रजातींची नोंद, zooplankton मध्ये खूप विविधता आढळली.
· मुळा-राम नदी संगमाच्या ठिकाणी, गोड्या पाण्यात आढळणाऱ्या Pettancylus tenuis या शंखवर्गीय प्राण्याची पुणे विभागातील पहिली नोंद झाली आहे.
· विठ्ठ्लवाडीला, गोड्या पाण्यात आढळणाऱ्या Lecane या प्रजातीतील रोटीफरची महाराष्ट्रातील पहिली नोंद झाली आहे.
----------------------