पुणे : चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येत गेल्या चार वर्षांपासून 1 मार्च हा दिवस राेटी डे म्हणून साजरा करतात. या दिवशी शहरातील गरजू नागरिकांना घरगुती ताजं अन्न दिलं जातं. या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवण्यात येताे. यंदाही या राेटी डे निमित्त पुण्यातील विविध भागातील रस्त्यावर राहणाऱ्या लाेकांना जेवण देण्यात आले. चित्रपट आणि नाट्य संस्थेच्या 60 ते 70 स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागात हा उपक्रम राबवला. या उपक्रमात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभाेसले आणि चित्रपट आणि नाट्य संस्थेचे शुभम माेरे हे देखील सहभागी झाले हाेते.
चार वर्षांपूर्वी अभिनेता अमित कल्याणकर याने राेटी डेची संकल्पना मांडली हाेती. त्याला त्याच्या सहकाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. गेल्या चार वर्षांपासून 1 मार्च हा दिवस राेटी डे म्हणून ओळखला जात असून या दिवशी या संस्थेचे स्वयंसेवक गरीब लाेकांना अन्नदान करतात. पुण्यातील विविध भागात हा उपक्रम राबवण्यात येताे. शहराच्या मध्यभागाबराेबरच उपनगरातही अन्नदान करण्यात येते. संस्थेचे स्वयंसेवक त्यांच्या घराजवळच्या गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान करु शकतात. यंदा संभाजीपार्क ते स्वारगेट या भागातील गरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. यात कलाकारांसाेबतच सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी झाले हाेते.